तो पेले नाही की जो आपल्या खेळाच्या जोरावर जिवंतपणीच दंतकथा बनला, तो मॅराडोना नाही की ज्याने केलेले गोल पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते, तो मेस्सी नाही की ज्याच्या सातत्याने गोल करण्याच्या हातोटीने आपण अचंबित व्हावे.. हे काहीही नसताना आणि गोल करण्याच्या साधारण आकडेवारीवर त्याने जगातला श्रीमंत फुटबॉलपटू होण्याचा मान मिळवला आहे. गॅरेथ बेल असं या चमत्काराचं नाव. स्पेनमधील प्रसिद्ध क्लब रिअल माद्रिदने त्याला आपल्या ताफ्यात समाविष्ट करण्यासाठी तब्बल ८८४ कोटी रुपये मोजले आहेत. टॉटनहॅम हॉटस्पर या इंग्लिश क्लबकडून माद्रिदने बेलला आपल्या संघात समाविष्ट केले.
जगाला आर्थिक मंदीने वेढलेले असताना एका खेळाडूसाठी आणि तेही कुठलीही असामान्य, अफाट क्षमता नसलेल्या खेळाडूसाठी रिअल माद्रिदने ओतलेली गंगाजळी फुटबॉलरसिकांना अचंबित करणारी आहे. विशेष म्हणजे बेलचा आधीचा संघ टॉटनहॅमने २००७ मध्ये केवळ ५१.५ कोटी रुपये खर्चून खरेदी केले होते. एखाद्या क्लबकडून दुसऱ्या क्लबचा भाग होताना खर्च करण्यात आलेली ही सर्वाधिक रक्कम आहे. टॉटनहॅम संघासाठी गेल्या सहा वर्षांत बेलने अवघे ५५ गोल केले आहेत. ही आकडेवारी निश्चितच चमकदार नाही, परंतु तरीही रिअलने सहा वर्षांच्या करारावर बेलसाठी प्रचंड खजिना रिता केला आहे.
बेलसाठी खर्च केलेल्या रकमेच्या निम्म्या रकमेत म्हणजेच ४३६ कोटी रुपयांमध्ये कतार इन्व्हेसमेंट ऑथॅरिटीने पॅरिस सेंट जर्मेन क्लबचे समभाग विकत घेतले होते. बेलवर खर्च झालेल्या रकमेतून त्याचा पूर्वाश्रमीचा संघ टॉटनहॅम दोन क्लब विकत घेऊ शकतो. बेलसाठी खर्च झालेली रकम काही देशांच्या दरडोई उत्पनापेक्षा जास्त आहे.
इंग्लंडच्या वेल्स प्रांतात जन्मलेल्या बेल टॉटनहॅमच्या आधी साउदॅम्पटन संघाचा भाग होता. संपूर्ण हंगामात चर्चेचा आणि उत्सुकतेचा मुद्दा ठरलेल्या या आर्थिक उलाढालीत रिअलने अखेर बेलला विक्रमी रक्कम देऊन खरेदी करत असल्याचे घोषित केले. फ्लोरेनटिनो पेरेझ हे अध्यक्ष असलेल्या रिअलबरोबर करारबद्ध होण्याआधी बेलने वैद्यकीय चाचणीचा अडथळा पार केला. पांढरा शर्ट, गडद काळ्या रंगाची विजार आणि काळ्या रंगाचाच टाय परिधान केलेल्या बेलचे रिअल माद्रिदच्या चाहत्यांसमोर आगमन झाले. औपचारिक कार्यक्रमानंतर रिअल माद्रिदच्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या पोशाखात ११ क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला बेल चाहत्यांसमोर अवतरला.

बेलच्या उत्पन्नाचे विवरण-(रुपयांमध्ये)
वार्षिक : १६० कोटी
प्रतिमहिना : १२ कोटी
प्रतिआठवडा : ३ कोटी
दरदिवशी : ४४ लाख
तासाला : २ लाख
प्रतिमिनिट : ३,५००

कोण आहे गॅरेथ बेल
जन्मदिन : १६ जुलै, १९८९
उंची : ६ फूट १ इंच
राष्ट्रीय संघ : वेल्स
खेळ : रग्बी, क्रिकेट, हॉकी, अ‍ॅथलेटिक्स.  
संघ : साउदॅम्पटन, टॉटनहॅम हॉटस्पर

रिअल माद्रिदसाठी खेळण्याचे माझे स्वप्न प्रत्यक्षात साकारले आहे. रक्कम किती हे महत्त्वाचे नाही. मला चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत रिअलचे प्रतिनिधित्व करायचे आहे. रिअलसाठी खेळण्याचे हे प्रमुख आकर्षण आहे. दहाव्या युरोपियन चषकाला गवसणी घालण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. क्लबचे आणि चाहत्यांचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन.
– गॅरथ बेल, सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू