अपेक्षेप्रमाणे तीन वेळ राष्ट्रीय विजेतेपद पटकावणाऱ्या गौरव गिलने आपला सहकारी मुसा शरीफसह बंगळुरू येथे आयोजित के१००० फेरीमध्ये अव्वल स्थान मिळवत २०१४ या वर्षांच्या इंडियन रॅली अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. गुणतालिकेत गिल सर्व स्पर्धकांच्या किती तरी पुढे असल्याने पुढील महिन्यात चिकमंगळूर येथे होणाऱ्या सहाव्या आणि अखेरच्या फेरीत गौरवची कामगिरी समाधानकारक न झाल्यास त्याचा संपूर्ण स्पर्धेच्या निकालावर कोणताही परिणाम होणार नाही.
दुपारी फेअरिफिल्ड मॅरियट हॉटेलमध्ये बक्षीस वितरण सोहळा झाला. यावेळी गौरव-मुसा यांच्यासह इतर स्पर्धकांना गौरविण्यात आले. यावेळी द फेडरेशन ऑफ मोटार स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष पृथ्वी राज, केएमसीएचे अध्यक्ष शिव शिवप्पा व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
२०१४च्या राष्ट्रीय स्पर्धेवर नाशिक येथे वेस्टर्न इंडिया स्पोर्ट्स असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित रॅली ऑफ महाराष्ट्र या पहिल्या फेरीपासून गौरवचा ठसा राहिला. पहिल्या चार फेऱ्यांपर्यंत गौरवच्या गुणांची संख्या १४५ झाली होती, तर द्वितीय क्रमांकावरील स्पर्धकांचे गुण ८०पर्यंतही पोहोचू शकले नव्हते. गौरवने याआधी इंडियन रॅलीचे अजिंक्यपद तीन वेळा मिळविले आहे. बेंगळुरूकर क्रीडाप्रेमींचे लक्ष लागलेली स्थानिक जोडी अर्जुन राव व सतीश राजगोपाल यांच्या गाडीत निर्माण झालेल्या बिघाडामुळे समाधानकारक कामगिरी करू शकली नाही. अखेरच्या दिवशी रविवारी तुमाकूरजवळील डोडागुनीच्या दुर्गम भागातील खाचखळग्यांच्या बारीक दगड वर आलेल्या रस्त्याने स्पर्धकांची चांगलीच परीक्षा पाहिली, तर स्पर्धा पाहण्यासाठी ठिकठिकाणी जमलेल्या ग्रामस्थांना या गाडय़ांच्या वेगामुळे उडणाऱ्या लाल मातीच्या धुळीने चांगलेच हैराण केले. अर्थात, त्यामुळे त्यांचा उत्साह कोणत्याही प्रकारे कमी झाला नाही. अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाची पर्वा न करता ते स्पर्धकांना घोषणा देऊन प्रोत्साहित करत होते.
दरम्यान, पाचव्या फेरीत द्वितीय क्रमांकावर सनी सिंधू-पीव्ही श्रीनिवासा मूर्ती, तर तृतीय क्रमांकावर अमरजित सिंग-अश्विन नाईक ही जोडी राहिली. आयआरसी २००० गटात करना कंदुर-सुजितकुमार बीएस, राहुल कन्थराज-विवेक भट्ट, बीराम गोदरेज-सोमय्या एजी, आयआरसी १६०० गटात फाल्गुना यूआरएस-अनुप कुमार, ऋषिकेश ठाकरसी-निनाद मिरजगावकर, विक्रम देवदासन-चंद्रमौली, आयआरसी एमएमएससीआय १६०० गटात अदिथ केसी-हरीश केएन, बोपायेह केएम-कोंगडा कारुंबाय, अनिरुद्ध रांजणकर-नितीन जेकॉब यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला.