नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता गौरव सोलंकी तसेच २०१९च्या इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेचा रौप्यपदक विजेता गोविंद सहानी यांनी रशिया येथे सुरू असलेल्या मगोमेद सलाम उमाखानोव्ह स्मृती आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे भारताची दोन पदके निश्चित झाली आहेत.

गौरवने ५६ किलो वजनी गटात रशियाच्या मॅक्सिम चेर्निशेव याच्यावर ३-२ असा निसटता विजय मिळवला. गौरव सुरुवातीला रशियाच्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध काहीसा सावध खेळ करत होता. मात्र त्यानंतर जोरदार ठोश्यांची सरबत्ती करत त्याने पंचांना आपल्या बाजूने निकाल देण्यास भाग पाडले.

त्यानंतरच्या लढतीत गोविंदने ताजिकिस्तानच्या शेर्मुखाम्माद रुस्तामोव्ह याचे आव्हान सहजपणे परतवून लावले. गोविंदने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा अवलंबत रुस्तामोव्हला नेस्तनाबूत केले होते. अखेपर्यंत त्याने हा पवित्रा तसाच कायम ठेवल्यामुळे तिसऱ्या फेरीत पंचांनी लढत थांबवून गोविंदला विजयी घोषित केले.

आशीष इन्शा याचे आव्हान मात्र उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. ५२ किलो वजनी गटाच्या या लढतीत आशीषला रशियाच्या इस्लामिदिन अलिसोल्टानोव्ह याने १-४ असे पराभूत केले. तिसऱ्या फेरीपर्यंत दोघांनीही तोडीस तोड खेळ केला होता. मात्र अखेरच्या क्षणी आशीषने प्रतिस्पध्र्याकडून ठोश्यांचा मार स्वीकारल्यामुळे त्याला पराभवाचा सामना करावा लागला. रशियाच्या डॅनियल लुटाइविरुद्धच्या सामन्यात कपाळावर जखम झाल्यामुळे २०१८च्या इंडिया खुल्या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या संजीतला लढत मध्येच सोडून द्यावी लागली.