वर्ष २००४ मध्ये भारत अ संघाची इंग्लंड दौ-यासाठी निवड झाली होती. बंगळुरूमध्ये संघाचं सराव शिबीर भरलं होतं. मी संघाचा प्रशिक्षक होतो आणि त्यावेळी मी पहिल्यांदा गौतम गंभीरला भेटलो. तो लाजाळू आणि कमी बोलणारा आहे हे कळत होतं , पण त्याच्यात ज्वालामुखीचा उद्रेक होतोय हे मला समजलं. भारतीय क्रिकेट संघाचे माजी निवड समितीचे अध्यक्ष  संदिप पाटील यांनी ‘द क्विंट’ या वृत्तपत्रासाठी लिहीलेल्या स्तंभामध्ये आपले विचार मांडले आहेत.

भारत अ संघात निवड झालेले सर्व खेळाडू विशेष होते आणि हे सांगायला मला अजून आनंद होतोय की, त्यातल्या अनेकांनी पुढे भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. पण त्या सर्वांपेक्षा गौतम गंभीर सर्वात गुणी आणि विशेष होता. मला गंभीरबाबत जाणून घ्यायची इच्छा झाली, म्हणून मी दिल्लीतील माझे मित्र(मदन लाल,यशपाल शर्मा आणि किर्ती आझाद) यांच्याशी त्याच्याबाबत बोललो. संघाचा प्रशिक्षक या नात्याने तुमच्या खेळाडूबाबत माहिती असणं नेहमी फायद्याचं असतं. माझ्या दिल्लीच्या मित्रांनीही गंभीर आताच्या घडीला भारतीय संघात स्थान मिळवण्यास अगदी योग्य असल्याचं म्हटलं.

त्या दौ-यानंतर गंभीरची भारतीय संघात निवड झाली, पण सलामीच्या जागी निवड होणं आणि ती टिकवून ठेवणं म्हणजे धोनीची अग्नीपरीक्षा होती. कारण…सचिन, सेहवाग, गांगुली यांसारख्या दिग्गज खेळाडूंशी त्याची स्पर्धा होती. पण स्वतःच्या शानदार खेळीमुळे गंभीरने सर्वांची मनं जिंकली आणि सलामीची जागा त्याच्यासाठीच असल्याचं सिद्ध केलं. त्यानंतर माझी आणि गंभीरची मैत्री घट्ट झाली, जेव्हाही आम्ही भेटायचो किंवा फोनवर बोलायचो आम्ही त्याच्या खेळाबद्दलच चर्चा करायचो.

गंभीरच्या चेह-यावर कारकिर्दीत यशाची शिडी चढण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. आमची मैत्री ७-८ वर्षांपर्यंत टिकली. पण त्यानंतर अचानक गंभीरला भारतीय संघातून वगळण्यात आलं, आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचं कारण होतं, त्याचा विक्षिप्त स्वभाव (attitude problem).
मी हे अगदी सहज सांगू शकतो की, त्याच्या स्वभावामुळेच (attitude) त्याची भारतीय संघात निवड झाली होती आणि तोच स्वभाव त्याला संघातून बाहेर जाण्यासही कारणीभूत ठरला. त्याच्या ‘अॅंग्री यंग मॅन’ स्वभावामुळेच मी त्याला भारतीय क्रिकेट संघाचा अमिताभ बच्चन असं नाव दिलं.

प्रत्येक खेळाडूच्या स्वभावामध्ये काहीतरी अडचण असते, पण खेळाडू जेव्हा स्वतःच्या संघातील खेळाडूंसमोर अशाच स्वभाव दाखवतो तेव्हा त्याचे परिणाम उलटे होतात. दुर्देव म्हणजे, यामुळे मी अनेक मित्र गमावले आहेत. पण माझ्यासाठी भारतीय क्रिकेट आणि भारतीय क्रिकेटचं भवितव्य सर्वस्व होतं.

भारतीय क्रिकेटमधला एक महान खेळाडू बनण्याची गौतम गंभीरकडे संधी होती. मात्र त्याने ती स्वतःच्या हाताने वाया घालवली. २०११ साली भारतीय संघांच्या इंग्लंड दौऱ्यात एका सामन्यादरम्यान गंभीरच्या डोक्याला चेंडू लागला, या घटनेनंतर गौतमने उर्वरित सामन्यांमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला. वास्तविक पाहता डॉक्टरांनी केलेल्या तपासणीमध्ये गौतमला झालेली दुखापत ही गंभीर स्वरुपाची नव्हती व तो सामने खेळू शकला असता. त्यादरम्यान मी NCA च्या संचालकपदी होतो. डॉक्टरांचा अहवाल आणि त्यावर गौतमने घेतलेला निर्णय पाहून मलाही त्यावेळी चांगलचं आश्चर्य वाटलं. भारतीय क्रिकेटचा महान खेळाडू बनण्याची गौतम गंभीरकडे संधी होती, पण त्याने ती गमावली. त्यानंतर गंभीरने पुनरागमनासाठी खूप प्रयत्न केले.

गंभीर पुनरागमनासाठी प्रयत्न करत होता त्यावेळेस, गंभीरचाच दिल्लीचा सहकारी शिखऱ धवन भारत अ साठी खेळताना मोठी धावसंख्या उभारत होता. मी त्यावेळी निवड समितीचा अध्यक्ष होतो आणि तेव्हा धवनला गंभीरऐवजी संधी देण्याचा निर्णय आम्ही निवडकर्त्यांनी घेतला. त्यानंतर गंभीरसाठी पुनरागमनाचे जवळपास सर्वच दरवाजे बंद झाले कारण, मुरली विजय देखील शानदार प्रदर्शन करत होता.
हीच ती वेळ होती जेव्हा गंभीरने आमची मैत्री संपवण्याचा निर्णय घेतला. मी त्याच्या भावना समजून घेतल्या आणि त्याला काहीही बोललो नाही किंवा ते मनाला लावूनही घेतलं नाही. आम्ही कधी समोर आलो तर तो क्वचितच हसतो, त्याला माझ्याबद्दल अजूनही राग आहे हे त्याला पाहताच समजतं. भारतीय संघासाठी निवड करताना मैत्री किंवा भावना या सर्व गोष्टी बाजूला ठेवाव्या लागतात. देशासाठी सर्वोत्तम खेळाडूंची निवड करणं हे माझं त्यावेळी काम होतं. जंगलाच्या राजालाही एक दिवस स्वतःच राज्य सोडावं लागतंच.

गंभीरने काही दिवसांपूर्वी दिल्लीच्या संघाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला, मी त्याच्या निर्णयाचा आदर ठेवतो. पण आयपीएल सुरू असताना मध्येच का राजीनामा दिला याचं उत्तर केवळ गंभीरच देऊ शकतो. एखाद्याच्या डोक्यात काय सुरू आहे हे केवळ तोच खेळाडू सांगू शकतो. भविष्यात काय होईल हे कोणालाच माहिती नाही. पण गौतम गंभीर हा नेहमीच माझा आवडता क्रिकेटपटू राहिल.