गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय संघाच्या कामगिरीत चांगला बदल झाला आहे. गोलंदाजी असो, फलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण प्रत्येक बाबतीत भारतीय खेळाडू आश्वासक कामगिरी करत आहेत. विराट कोहली, रविंद्र जाडेजा, मनिष पांडे, अजिंक्य रहाणे यासारखे चांगले खेळाडू टीम इंडियाला लाभले आहेत. रविंद्र जाडेजा आपल्या फिरकी गोलंदाजी, मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी आणि मैदानातलं चपळ क्षेत्ररक्षण यासाठी ओळखला जातो. भारताचा माजी फलंदाज गौतम गंभीरने जाडेजाचं कौतुक करताना, तो सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वोत्तम क्षेत्ररक्षक असल्याचं म्हटलं आहे.

“आताच्या घडीला जाडेजाइतका सर्वोत्तम क्षेत्ररक्षक कुठेच नाहीये. तो स्लिपमध्ये किंवा गलीमध्ये क्षेत्ररक्षण करताना तुम्हाला दिसणार नाही, पण त्याचा थ्रो अजुनही जबरदस्त आहे. त्याच्यासारखा थ्रो अजुनही कोणाला जमत नाही. त्याला क्षेत्ररक्षणासाठी पॉईंटवर ठेवा किंवा कव्हर्समध्ये, त्याच्यासारखी चांगली कामगिरी करणारा क्षेत्ररक्षक कुठेच नाही. तो कॅचही चांगल्या पकडतो. याचसाठी मला तो सध्याच्या घडीचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय क्षेत्ररक्षक वाटतो.” गंभीर Star Sports वाहिनीच्या Cricket Connected वाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होता.

करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या ३ महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने बंद आहेत. लॉकडाउन काळात सर्व भारतीय क्रिकेटपटू आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. रविंद्र जाडेजानेही या काळात आपला घोडेस्वारीचा छंद पुन्हा जोपासला होता. बीसीसीआयने करोनाची परिस्थिती लक्षात घेता आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केला होता. पण ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वर्षाअखेरीस या स्पर्धेचं आयोजन करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. जाडेजा आयपीएलमध्ये चेन्नईचं प्रतिनिधीत्व करतो.