कोणत्याही खेळाडूचे स्वप्न हे देशासाठी विश्वचषकात सहभागी होण्याचे असते, पण भारताचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा कर्णधार गौतम गंभीर हा सध्या विश्वचषकाचा नाही तर आयपीएलचा विचार करीत आहे. गंभीरने अर्धशतकांची हॅट्ट्रिक लगावत कोलकातासाठी दमदार कामगिरी केली असून आगामी इंग्लंड दौरा आणि विश्वचषकाचा विचार करीत नसल्याचे त्याने सांगितले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये सुरुवातीच्या तीन सामन्यांमध्ये गंभीरला भोपळाही फोडता आला नव्हता. पण त्यानंतर त्याने दमदार कामगिरी करीत संघाच्या विजयात मोलाची भूमिका वठवली आहे. पण असे असले तरी आयपीएल भारतीय संघात परतण्याचे व्यासपीठ ठरू शकत नाही, असे गंभीरला वाटते.
‘‘माझ्या मते आयपीएल हे भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठीचे व्यासपीठ ठरू शकत नाही. पण ही एक मोठी स्पर्धा आहे, ज्याचा आनंद सारेच उपभोगत आहेत. सध्याच्या घडीला माझे लक्ष फक्त आयपीएलवर केंद्रित असून मी त्याचाच विचार करीत आहे. आमच्या संघामध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंचा चांगला समतोल आहे. या वर्षीही संघाची चांगली कामगिरी होईल,’’ अशी आशा गंभीरने व्यक्त केली.