भारताचा अनुभवी क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी हा ICCच्या तीनही महत्त्वाच्या ट्रॉफी जिंकणारा एकमेव कर्णधार आहे. धोनीला सारेच यशस्वी कर्णधार मानतात, पण माजी फलंदाज गौतम गंभीर याच्या मते धोनीला हे यश निव्वळ नशिबामुळे आणि गांगुलीच्या मेहनतीमुळे मिळालं आहे. “धोनी खूपच नशिबवान कर्णधार होता. २०११ च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. संघात सचिन, सेहवाग, मी, युवराज, युसूफ, विराट सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते. गांगुलीने या साऱ्यांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. पण धोनीला मात्र ‘रेडीमेड’ संघ मिळाला आणि म्हणूनच त्याला एवढ्या साऱ्या ट्रॉफीज जिंकता आल्या”, असे स्पष्ट मत गंभीरने मांडले.

याच वेळी गंभीरने अशादेखील सवाल केला होता की गांगुलीने भारताला सेहवाग, युवराज, हरभजन, जहीर खान यांसारखे खेळाडू दिले. तसे धोनीने भारताला काय दिले? यावर एका चाहत्याने गंभीरला सडेतोड उत्तर दिलं. धोनीने भारताला काय दिलं याची यादीच त्या चाहत्याने ट्विट केली. सध्याच्या क्रिकेटयुगातील सर्वोत्तम फलंदाज विराट कोहली, सर्वोत्तम सलामीवीर रोहित शर्मा, ICC चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत दोन वेळा मालिकावीर ठरलेला शिखर धवन, सर्वोत्तम टी-२० फलंदाज सुरेश रैना, जगातील सर्वोत्तम फिल्डर रविंद्र जाडेजा हे सारं धोनीने भारताला दिलं, असे त्या चाहत्याने ट्विट केलं.

दरम्यान, मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनी हा गांगुलीपेक्षा चांगला कर्णधार होता असेही मत गंभीरनेच व्यक्त केलं. “वन डे क्रिकेटमध्ये धोनी सरस होता. विशेषकरुन महत्वाच्या स्पर्धांचा निकष लावायला गेलो, तर धोनी नक्कीच चांगला कर्णधार होताय. टी-२० विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी, वन-डे विश्वचषक या स्पर्धा धोनीने कर्णधार म्हणून भारताला जिंकवून दिल्या. एक कर्णधार म्हणून यापेक्षा चांगली कामगिरी असूच शकत नाही”, असे मतदेखील गंभीरनेच मांडले होते.