भारताचा दिग्गज डावखुरा फलंदाज गौतम गंभीर सात वर्षांनंतर पुन्हा एकदा आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. यापूर्वी तो या संघाचा २०१० मध्ये कर्णधार होता. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत त्याच्या नावाची घोषणा करण्यात आली. गौतम गंभीर यापूर्वी २००८, २००९ आणि २०१० मध्ये दिल्लीच्या संघात होता.

वर्ष २००८ च्या हंगामात तो सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरला होता. त्याने त्यावेळी ५३४ धावा काढल्या होत्या. दरम्यान, कोलकाता नाईट रायडर्सला (केकेआर) दोनवेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवून दिले होते. आश्चर्यकारक म्हणजे यंदाच्या खेळाडुंच्या लिलावावेळी संघाचे सहमालक जुही चावला आणि शाहरूख खान यांनी त्याला संघात घेण्यात रस दाखवला नव्हता.

अखेर दिल्ली डेअरडेविल्सने गौतम गंभीरला २ कोटी ८० लाख रूपयात खरेदी केले. दिल्लीचा संघ गौतम गंभीरचा जुना संघ आहे. त्याने याच संघातून आयपीएलमधील आपली कारकीर्द सुरू केली होती. आयपीएलच्या सुरूवातीच्या चार हंगामात जगभरातील महागडे खेळाडू आणि प्रशिक्षक घेऊनही केकेआरला समाधानकारक कामगिरी करता येत नव्हती. त्यामुळे शाहरूख खानने स्वत: पुढाकार घेत गौतम गंभीरला नऊ कोटी रूपयांत संघात घेतले होते. गंभीरनेही शाहरूखला निराश केले नाही. त्याने केकेआरला दोन वेळा (२०१२-२०१४) मध्ये जेतेपदाचा किताब मिळवून दिला.

नेतृत्वाबरोबरच त्याने आपल्या फलंदाजीनेही सहकारी खेळाडुंना प्रोत्साहन दिले. गंभीरने आतापर्यंत आयपीएलचे १४८ सामने खेळले असून यामध्ये त्याने ३१.७८ च्या सरासरीने ४१३२ धावा केल्या आहेत. त्याने ३५ अर्धशतके ठोकली आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये त्याचा चौथा क्रमांक लागतो. सर्वाधिक अर्धशतक करणाऱ्यांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे. पहिल्या स्थानी ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर आहे.