ICC च्या तीनही महत्त्वाच्या ट्रॉफीजसह इतर अनेक स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. धोनीला सारेच यशस्वी कर्णधार मानतात, पण धोनीला हे यश निव्वळ नशिबामुळे आणि गांगुलीच्या मेहनतीमुळे मिळालं आहे. २०११ च्या विश्वचषक संघाचे नेतृत्व करणं फारसं अवघड नव्हतं. संघात सगळेच प्रतिभावंत खेळाडू होते. गांगुलीने या साऱ्यांना एकत्र घेऊन संघ घडवला आणि उभा केला. धोनीला मात्र ‘रेडीमेड’ संघ मिळाला, असे मत माजी फलंदाज गौतम गंभीर याने क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमात व्यक्त केले. याच कार्यक्रमात गंभीरने, परदेशात क्रिकेट मालिका खेळायला गेले असताना धोनीसोबत रूम शेअर करण्याबाबतचा एक किस्सा सांगितला.

एके ठिकाणी क्रिकेट मालिका खेळायला गेलो असताना मी आणि धोनी रूम शेअर करत होतो. जवळपास महिनाभर आम्ही रूममेट होतो. त्यावेळी आम्ही खूप वेळ त्याच्या केसांच्या बाबतीतच गप्पा मारायचो कारण तेव्हा त्याचे केस लांब होते. तो त्याच्या केसांची काळजी कशी घेतो. लांब केसांची कशाप्रकारे निगा राखतो अशा विषयावर आमच्या गप्पा चालायच्या. मला आठतंय की धोनीसोबत रूम शेअर करताना आम्हाला दोघांना जमिनीवर झोपावं लागलं होतं. कारण ती रूम खूपच छोटी होती. आम्ही ती रूम मोठी कशी करता येईल याचीही चर्चा केली. मग रूममधून बेड बाहेर काढून टाकले आणि जमिनीवरच गादी घालून झोपलो”, असे गौतम गंभीरने सांगितलं.

“आम्ही दोघेही तेव्हा अगदी तरूण होतो. धोनीने तर नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरूवात केली होती. आम्ही केनया दौऱ्यावर एकत्र गेलो. त्यानंतर भारत अ संघाकडून झिम्बाव्बे दौऱ्यावर गेलो. आम्ही खूप वेळ एकत्र मजेत घालवला. तुम्ही जेव्हा दीड महिना एका माणसासोबत रूम शेअर करता, त्यावेळी तुम्ही त्याला अधिक चांगलं ओळखता आणि तुमची मैत्री घट्ट होते”, असेही गंभीर म्हणाला.