कसोटी क्रिकेटमध्ये आपला दिल्लीकर साथीदार विरेंद्र सेहवागच्या सोबत येऊन गोलंदाजांची तंत्रशुद्ध धुलाई करणारा गौतम आजही अनेक रसिकांच्या मनात घर करुन आहे. २०११ साली झालेल्या विश्वचषकातही गौतम गंभीरचं योगदान हे महत्वाचं आहे. मनगटाचा सफाईदारपणे वापर करुन ड्राईव्हचे फटके, हुक-पूलच्या फटक्यांमधली नजाकत गौतमने गेली अनेक वर्ष आपल्या मेहनतीने कमावली होती. भारताच्या प्रत्येक विजयात मोलाची भूमिका बजावलेला मात्र नेहमी पडद्याच्या आड राहिलेल्या गौतम गंभीरच्या कारकिर्दीतले ५ महत्वाचे क्षण आज आपण जाणून घेणार आहोत.

१) …..आणि गौतमने सामनावीराचा किताब विराट दिला

गोष्ट आहे २००९ साली झालेल्या श्रीलंका विरुद्ध भारत सामन्याची. कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानात भारत श्रीलंकेने विजयासाठी दिलेलं ३१६ धावांचं आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरला. गौतम आणि विराट या दोन दिल्लीकरांनी २२४ धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. याच सामन्यात विराटने आपलं पहिलं वन-डे शतक झळकावलं, आणि नंतर तो बाद झाला. मात्र गौतमने नाबाद १५० धावांची खेळी करत भारताला सामना जिंकवून दिला.

या कामगिरीसाठी गौतमला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. मात्र त्यावेळी संघात नवीन असलेल्या विराटच्या खेळीचं कौतुक करण्यासाठी गौतमने आपला सामनावीराचा किताब विराटला दिला होता.

२) २००९ सालात कसोटी क्रिकेटमधलं सर्वोच्च स्थान

२००८-१० हा काळ गौतम गंभीरसाठी अक्षरशः सोन्याचा काळ होता. २००९ सालात गौतमने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थान पटकावलं. ८८६ गुणांसह गौतमने क्रमवारीत पहिलं स्थान प्रदीर्घ काळासाठी राखून ठेवलं होतं.

गौतमने भारताकडून ५८ कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये त्याने ४१५४ धावा ४१.९६ च्या सरासरीने काढल्या. कसोटी क्रिकेटमधल्या या कारकिर्दीत गौतमच्या नावावर ९ शतकं आणि एका द्विशतकाचा समावेश आहे.

३) नावाने गंभीर मात्र मैदानावर तितकाच आक्रमक

गौतम गंभीर मैदानात खेळत असताना अनेकदा प्रतिस्पर्धी खेळांडूंशी भिडलेला आपण पाहिला आहे. वानखेडे मैदानावर दक्षिण आफ्रिकेच्या अँड्रे नेल, कानपूरच्या मैदानावर शाहीद आफ्रिदीशी झालेली बाचाबाची, घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉटसनला धाव काढताना दिलेला धक्का किंवा आयपीएलदरम्यान चिन्नास्वामी मैदानावर विराट कोहलीशी झालेला भांडणं या सर्व कारणांमुळे गौतम चर्चेत राहिला होता. दिल्लीचे खेळाडू हे स्वभावाने आक्रमक असतात असं म्हटलं जातं, याचा पुरेपूर प्रत्यय गौतमने मैदानात दिला होता.

४) पहिल्या टी-२० विश्वचषकातली पाकिस्तानविरुद्ध सामन्यातली ‘ती’ खेळी

२००७ साली दक्षिण आफ्रिकेत झालेला टी-२० विश्वचषक हा भारतासाठी कित्येक अर्थाने महत्वाचा होता. पहिला विश्वचषक जिंकण्याचा मान भारताने पटकावला होता. अंतिम सामन्यात पाकिस्तानविरुद्ध गौतम गंभीरने फलंदाजीदरम्यान आपली महत्वाची भूमिका बजावली होती. विरेंद्र सेहवागशिवाय खेळणारा भारतीय संघ युसूफ पठाण आणि रॉबिन उथप्पाच्या लवकर बाद होण्यामुळे अडचणीत सापडला. मात्र गौतम गंभीरने एका बाजूने भारताची बाजू लावून धरत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली.

सामन्याच्या १८ व्या षटकात पाकिस्तानी गोलंदाजांनी गौतमला माघारी धाडलं. मात्र तोपर्यंत गौतमने ५४ चेंडूत ७५ धावांची खेळी केली होती.

५) २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातली महत्वपूर्ण खेळी

वानखेडे मैदानावर विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने श्रीलंकेवर मात करुन स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. लंकेने दिलेलं २७५ धावांचं आव्हान पार करताना विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर हे बिनीचे शिलेदार लवकर माघारी परतले. यावेळी गौतमने आपली जबाबदारी ओळखून खेळपट्टीवर नांगर टाकत आश्वासक खेळी केली. पहिल्यांदा विराट कोहली आणि त्यानंतर महेंद्रसिंह धोनीसोबत महत्वाच्या भागीदाऱ्या रचत गौतमने भारतीय संघाचं आव्हान सामन्यात कायम राहिलं. या सामन्यात गौतमने ९७ धावांची खेळी करत भारताच्या विजयात आपलं योगदान दिलं.