कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा आत्मा आहे असं म्हटलं जातं. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूचा खरा कस लागतो. त्यामुळे कसोटी क्रिकेट जिवंत ठेवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कसोटी क्रिकेटला प्रेक्षकवर्ग मिळावा यासाठी दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रयोग करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला, पण आता क्रिकेटची सर्वोच्च परिषद असलेली ICC कसोटी क्रिकेट सामन्यांचा कालावधी कमी करण्याचा विचार करत आहे. कसोटी सामना म्हणजे पाच दिवस हे समीकरण आहे. पण प्रत्येक वर्षातील प्रचंड गजबजलेले क्रिकेट दौरे लक्षात घेता ICC कसोटी क्रिकेट सामन्याचे स्वरूप बदलून ते ४ दिवसांचे करण्याचा विचार करत आहे. याबाबत क्रिकेट वर्तुळातून टीकेचा सूर उमटत असून माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही यावर सडकून टीका केली आहे.

VIDEO : मैदानात राडा… वॉर्नरने पंचांशीच घातली हुज्जत

काय म्हणाला गंभीर?

गौतम गंभीरने आपल्या स्तंभात चार दिवसाच्या कसोटी सामन्याच्या कल्पनेबद्दल रोखठोक मत व्यक्त केले आहे. “सर्वप्रथम मला हे सांगावंसं वाटतं की चार-दिवसाच्या कसोटी सामन्याची कल्पना हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. ही कल्पना अजिबात अंमलात आणली जाऊ नये. ही कल्पना म्हणजे अनिर्णित सामन्यांना निमंत्रण असेल. फिरकीपटूंना स्वत:ला सिद्ध करण्याची पुरेशी संधी मिळणार नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटची मजा कमी होईल”, असं गंभीरने स्पष्टपणे लिहिले आहे.

“…तरीही चर्चा होणारच”; ICC आडमुठ्या भूमिकेवर ठाम

“अनेकांनी कसोटी क्रिकेट जगवण्यासाठी विविध कल्पना सांगितल्या. पण मला असं वाटतं की चॅम्पियन खेळाडूंची कमतरता आणि खेळपट्टीचा कमी झालेला जिवंतपणा यामुळे कसोटी क्रिकेट अडचणीत आहे. त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे”, असेही त्याने नमूद केले.

ICC आपल्या भूमिकेवर ठाम

ICC च्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या अनिल कुंबळे यांनी चार दिवसाच्या कसोटी सामन्यांच्याबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. ICC च्या आगामी काळात होणाऱ्या सभेत यावर चर्चा होणार असल्याचे कुंबळे यांनी स्पष्ट केले आहे. ICC ची पुढील सभा २७ ते ३१ मार्च या कालावधीत दुबई येथे होणार आहे. या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा केली जाणार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर ICC ठाम असल्याचे दिसत आहे.

गांगुलीवर माझा विश्वास, तो ‘असं’ होऊच देणार नाही – शोएब अख्तर

दरम्यान, ICC चार दिवसाचा कसोटी सामना करण्याचा प्रस्ताव चर्चेला आणणार आहे. सध्या क्रिकेटमधील जुने-जाणते तज्ञ्ज तसेच बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंकेतील माजी फिरकीपटू या कल्पनेच्या विरोधात आहेत. त्यामुळे या प्रकारावर फारसा सकारात्मक प्रतिसाद दिसलेला नाही. कसोटी सामना चार दिवसांचा करण्याच्या नियमाची अंमलबजावणी २०२३ पासून होण्याची शक्यता आहे. २०२३ ते २०३१ या कालावधीत होणाऱ्या कसोटी सामन्यांसाठी हा नियम राबवला जाण्याची शक्यता आहे. पण याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. याबाबत विचारविनिमय सुरु असून तज्ज्ञांकडून मत मागवली जात आहेत.