भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू आणि आयपीएलमध्ये दिल्ली आणि कोलकाता संघाचं प्रतिनिधीत्व केलेला गौतम गंभीर आगामी काळात नव्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीकडून नवी दिल्लीतून लोकसभेत निवडून गेलेल्या गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्स संघाचे १० टक्के समभाग खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे.

GMR उद्योग समुहाकडे सध्या दिल्ली कॅपिटल्स संघाचे ५० टक्के सहभाग आहेत. गौतम गंभीरची सध्या १० टक्के समभाग खरेदी करण्याबद्दल GMR उद्योग समुहाशी चर्चा सुरु असून, आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलच्या संमतीनंतर याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात येईल असं कळत आहे. १० टक्के समभाग खरेदी करण्यासाठी गौतम गंभीरला अंदाजे १०० कोटी रुपयांच्या घरात किंमत मोजावी लागणार आहे.

गेल्या हंगामात दिल्लीच्या संघात मोठे बदल झाले. नवीन जिंदाल यांच्या JSW उद्योग समुहाने ५५० कोटी रुपये मोजत दिल्ली संघाची सह-मालकी आपल्याकडे घेतली. यानंतर दिल्ली डेअरडेविल्सवरुन संघाचं नाव दिल्ली कॅपिटल्स करण्यात आलं. यानंतर गतवर्षीच्या हंगामात दिल्लीच्या संघाने आश्वासक कामगिरी केली होती. गौतम गंभीरने याआधी आयपीएलमध्ये दिल्ली आणि कोलकाता संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. आपल्या नेतृत्वाखाली गौतमने कोलकात्याला विजेतेपद मिळवून दिलं असलं तरीही दिल्लीकडून त्याची कारकिर्द फारशी चांगली राहिलेली नाही. त्यामुळे गव्हर्निंग काऊन्सिलची मान्यता मिळाल्यास गौतम गंभीर लवकरच नवीन भूमिकेत दिसणार आहे.