नवी दिल्ली : रोहित शर्माच्या दुखापतीबाबत प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी कर्णधार विराट कोहलीला सर्व माहिती पुरवणे अपेक्षित होते, असे स्पष्ट मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले.

रोहितच्या तंदुरुस्तीबाबत आपल्याला संपूर्ण माहिती नसल्याचे कोहलीने काही दिवसांपूर्वी सांगितले होते. त्यामुळे गंभीरने शास्त्री यांना यासाठी जबाबदार धरले आहे. ‘‘सर्वप्रथम कोणत्याही संघाच्या कर्णधाराला उपकर्णधाराबाबत पुरेशी माहिती असणे आवश्यक आहे. जर दोघांमध्ये तितके संभाषणही नसेल, तर त्यावरूनच संघात चिंतेचे वातावरण असल्याचे संकेत मिळतात. परंतु काही कारणास्तव तसे झाल्यास प्रशिक्षकांनी पुढाकार घेऊन संघातील कोणत्याही खेळाडूच्या तंदुरुस्तीविषयीची माहिती कर्णधारापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे,’’ असे गंभीर म्हणाला.

‘‘शास्त्री यांनी रोहितच्या तंदुरुस्तीबाबत कोहलीला कळवायला हवे होते. कारण ज्या वेळी कोहली पत्रकार परिषदेसाठी गेला, त्या वेळी त्याच्यावर रोहितच्या तंदुरुस्तीबाबतच्या प्रश्नांचा भडिमार होणे स्वाभाविक होते,’’ असेही गंभीरने सांगितले. माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणनेसुद्धा रोहितच्या तंदुरुस्तीबाबत संघ व्यवस्थापनाने ढिसाळपणा दाखवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. त्याशिवाय रोहित आता पूर्णपणे तंदुरुस्त झाला तरी, त्याला विलगीकरणाच्या कठोर नियमांमुळे कसोटी मालिकेत खेळण्याची संधी मिळणार नाही, असेही लक्ष्मण म्हणाला.