भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने सध्याच्या संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्रींवर जोरदार टीका केली आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ गेल्या १५ वर्षातला सर्वोत्तम संघ असल्याचं रवी शास्त्रींनी गेल्या काही दिवसांपूर्वी वक्तव्य केलं होतं. या वक्तव्याचा समाचार घेताना गौतम गंभीरने रवी शास्त्रींना तुमचं कर्तृत्व काय असा परखड सवाल विचारला आहे. तो CricketNext या संकेतस्थळाशी बोलत होता.

” जे खेळाडू कधीच जिंकले नाहीयेत, तेच अशा प्रकारची वक्तव्य करतात. ऑस्ट्रेलियात वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धा जिंकण्याच्या व्यतिरीक्त शास्त्री यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलंय काय हा एक मोठा प्रश्नच आहे. परदेशात विजय मिळवलेल्या एकाही भारतीय संघात ते सदस्य नव्हते. जर तुम्ही स्वतः कधीही अशी कामगिरी केली नसाल, तेव्हा तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करत सुटता. माझी खात्री आहे की लोकांनी या वक्तव्याला फारसं महत्वं दिलं नसेल. जर शास्त्रींना क्रिकेटजी जाण असती तर त्यांनी असं वक्तव्य दिलंच नसतं.” गंभीरने आपलं परखड मत मांडलं.

अवश्य वाचा – अनिल कुंबळेंच्या गच्छंतीमागे विराट कोहलीचाच हात ! डायना एडुलजींच्या ई-मेलमधून गौप्यस्फोट

हा बालिशपणा आहे. जरी तुम्ही मालिका ४-१ च्या फरकाने जिंकलात तरीही हा संघ सर्वोत्तम आहे असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मिळालेला विजय स्विकारुन पुढच्या मालिकेत अधिक चांगला खेळ करण्याकडे तुमचा कल असला पाहिजे. अशी वक्तव्य कऱणं बालिशपणाचं लक्षण आहे, मी त्याच्याकडे लक्ष देत नाही, गंभीर बोलत होता. गंभीरच्या आधी सुनिल गावसकर आणि सौरव गांगुली यांनीही रवी शास्त्री यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला होता.

अवश्य वाचा – धोनीवर टीका करणाऱ्या गंभीरवर नेटीझन्स संतापले…