भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी दाखवलेली आहे. जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अतिरेकी हल्ल्यात अब्दुल रशिद हे पोलिस अधिकारी शहीद झाले होते. यानंतर रशिद यांची ५ वर्षाची मुलगी ‘झोरा’च्या शिक्षणाचा खर्च आता गौतम गंभीर उचलणार आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन गौतमने झोराचा फोटो करत तिच्या भविष्यातला शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचं आश्वासन दिलं आहे.

“झोरा मी तुला तुझ्या बाबांसारखं जवळ घेऊन झोपवू शकत नाही. मात्र झोपेतून उठल्यानंतर तुला चांगली स्वप्न पाहण्यासाठी मी नक्की मदत करेन. तुझ्या शिक्षणाचा सर्व खर्च यापुढे मी करायला तयार आहे.” अशा आशयाचा संदेश देत गौतम गंभीरने आपल्या सामाजिक जाणिवेचं प्रदर्शन घडवलं आहे.

गरीब आणि गरजू लोकांना मदत करण्याची गौतम गंभीरची ही पहिलीच वेळ नाहीये. यापूर्वीही गंभीरने सुरक्षादलातील जवानांना मदत केली होती. काही दिवसांपूर्वी सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या सीआरपीएफच्या जवानांच्या मदतीसाठी गौतम गंभीरने आपली आयपीएलमधली सर्व कमाई देऊ केली होती.