भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरच्या दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या व्यवस्थापकीय समितीवर शासनाचा प्रतिनिधी म्हणून केलेल्या नियुक्तीबाबत दुहेरी निष्ठेचा पेच निर्माण झाला आहे.

गंभीर हा अजूनही आंतरराष्ट्रीय व आयपीएलच्या सामन्यांमध्ये भाग घेत असतो. त्याची ही नियुक्ती केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्या शिफारशीनुसार झाली आहे. लोढा समितीच्या शिफारशींनुसार प्रथम दर्जाच्या सामन्यांमध्ये भाग घेणाऱ्या खेळाडूस धोरण ठरवणाऱ्या संघटनेवर काम करण्यास मनाई आहे. दिल्ली संघटनेची व्यवस्थापन समिती कार्यरत झाल्यानंतर प्रशिक्षक व निवड समिती नियुक्त करण्याचे अधिकार त्यांना मिळणार आहेत. जोपर्यंत गंभीर खेळत आहे, तोपर्यंत त्याला या समितीवर काम करता येणार नाही.

दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्ली संघटनेवर निवृत्त न्यायाधीश विक्रमजित सेन यांची व्यवस्थापकपदी नियुक्ती केली आहे. ते म्हणाले, ‘‘संघटनेसाठी व्यवस्थापन समिती स्थापन केली असल्याबाबत मला कोणतीही माहिती नाही. तसेच गंभीरच्या नियुक्तीबाबतही मला शासनाकडून कोणतीही माहिती आलेली नाही. याबाबत मी राठोड यांच्याकडे संपर्क साधून रीतसर लेखी माहिती घेणार आहे.’’