वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलने आक्रमक अर्धशतक झळकावत भारतीय गोलंदाजांना धोक्याचा इशारा दिला आहे. वेस्ट इंडिज व उत्तर प्रदेश यांच्यातील तीन दिवसांचा क्रिकेट सराव सामना अनिर्णीत राहिला.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील ४६६ धावांना उत्तर देताना उत्तर प्रदेशने पहिला डाव ९ बाद ३७२ धावांवर घोषित केला. परविंदर सिंगने केलेल्या शैलीदार ११२ धावा तसेच त्याने आमीर खान याच्या साथीत केलेली ५७ धावांची भागीदारी हे त्यांच्या डावाचे वैशिष्टय़ ठरले. आमीर खानने ४७ धावा केल्या. पीयूष चावलाने आक्रमक खेळ करत ४६ धावा केल्या.
उर्वरित औपचारिकता राहिलेल्या खेळात विंडीजने ३७ षटकांमध्ये ५ बाद १९९ धावा करीत फलंदाजीचा सराव केला. गेलने ४९ चेंडूंमध्ये ११ चौकारांसह ५८ धावा केल्या. मार्लन सॅम्यूएल्सने ५८ धावा करताना नऊ चौकार व एक षटकार अशी फटकेबाजी केली. उत्तर प्रदेशकडून पीयूष चावलाने चार बळी टिपले.