एकिकडे महिला दिनाचा उत्साह साजरा करण्यात येत होता, महिलांच्या यशाच्या गाथा अनेकांना प्रोत्साहित करत होत्या तर दुसरीकडे क्रीडा विश्वात मात्र वेगळ्या विषयाच्या चर्चा रंगल्या होत्या. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या एक दिवस आधीच बीसीसीआयने आपल्या महिला व पुरुष खेळाडूंसाठी वार्षिक कराराची यादी जाहीर केली. एकीकडे महिला क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत तोडीस तोड कामगिरी करत असताना, वार्षिक करारांत मात्र बीसीसीआयने महिला खेळाडूंवर अन्याय केल्याचं दिसून आलं. क्रीडा विश्वात याविषयीच्याच चर्चा रंगण्यास सुरुवात झाली आणि पाहता पाहता सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले.

विश्वचषकाच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारल्याचा मोबदला म्हणून भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडूंना हे बक्षीस मिळालं आहे, असं म्हणत बीसीसीआयला लाज वाटली पाहिजे, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी क्रिकेट बोर्डावर तोफ डागली. काही युजर्सनी मिताली राज आणि विराट कोहली यांच्या मानधनाच्या आकड्यांमध्ये असणाऱ्या तफावतीकडे लक्ष वेधलं, तर काहींनी महिला आणि पुरुष क्रिकेट खेळाडूंच्या हाती येणाऱ्या कमाईचे आकडे पाहात ही बाब चूकीची असल्याचं बीसीसीआयला ठणकावून सांगितलं. महिला दिनाचा उत्साह आणि महिला क्रिकेट खेळाडूंवर झालेला अन्याय या दोन्ही गोष्टी एकमेकांशी जोडत नेटकऱ्यांनी बासीसीआयवर आगपाखड केल्याचं पाहायला मिळालं.

पाहा : VIDEO : अबॉटच्या ‘या’ उसळत्या चेंडूमुळे दुर्दैवी आठवणींना पुन्हा जाग

पुरुष क्रिकेटपटूंच्या C गटातील खेळाडूंना मिळणाऱ्या वार्षिक कराराच्या अर्धी रक्कम महिला खेळाडूंच्या A गटातील खेळाडूंना मिळत आहे. मात्र गांभीर्याने विचार केल्यास महिला क्रिकेटपटूंबद्दलचं हे उदासीन धोरणच सध्या प्रकाशझोतात आलं आहे.