भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा निरस झाला तो बेजान खेळपट्टीमुळे आणि यावर कडाडून टीका केली आहे ते इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक जेफ्री बॉयकॉट यांनी. नॉटिंगहॅमची निर्जीव खेळपट्टी बनवणे हे मायदेशातील गोलंदाजांना कमी लेखण्यासारखे आहे. खेळपट्टी बनवणाऱ्यांचा इंग्लंडच्या गोलंदाजांवर विश्वास नसावा, असेच यामधून दिसते. पण जर अशाच खेळपट्टय़ा बनवल्या गेल्या तर क्रिकेटचा आनंद लुटता येणार नाही. त्यामुळे नॉटिंगहॅमसारख्या निर्जीव खेळपट्टय़ा बनवणे बंद करा, असे मत बॉयकॉट यांनी आपल्या स्तंभात मांडले आहे.
‘‘पहिल्या कसोटीमध्ये कोणत्याही गोलंदाजाला चांगली उसळी मिळाली नाही. चेंडू हा कायम खाली राहत होता. खेळपट्टीमध्ये कोणताही जान नव्हती. प्रेक्षक महागडी तिकिटे विकत घेऊन चांगला सामना पाहायला येतात, पण या निर्जीव खेळपट्टीमुळे सर्वाचीच निराशा झाली आहे,’’ असे बॉयकॉट म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, जर अशाच खेळपट्टय़ा बनवल्या गेल्या तर गोलंदाज स्वत:ला कमी लेखू लागतील, त्यांच्या मनोबलाचे खच्चीकरण करण्याचा हा प्रकार आहे. यामुळे ते आत्मविश्वास गमावून बसतील आणि चांगले क्रिकेट खेळता येणार नाही. त्याचबरोबर अशा खेळपट्टय़ांमुळे गोलंदाजांना दुखापतही होऊ शकते. त्यामुळे अशा खेळपट्टय़ा बनवण्याचा विचार डोक्यातून काढायला हवा. इंग्लंडमध्ये जशा खेळपट्टय़ा असतात त्या तशाच बनवायला हव्यात, तरच क्रिकेटचा आनंद लुटता येईल. नाही तर इंग्लंडमधले क्रिकेट निरस होऊन जाईल.