भारतात इंडियन प्रमिअर लीगचा बारावा हंगाम आता उत्तरार्धाकडे सरकत चालला आहे. प्रत्येक दिवशी रंगणाऱ्या सामन्यांमध्ये नवीन विक्रम आणि रंगत पहायला मिळते आहे. याचदरम्यान स्कॉटलंडमध्ये जॉर्ज मुन्सी नावाच्या फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये धडाकेबाज खेळीची नोंद करत भीमपराक्रम केला आहे. मुन्सीने पहिल्या १७ चेंडूत अर्धशतक झळकावलं, मात्र यानंतरच्या ८ चेंडूमध्ये त्याने फटकेबाजी करत थेट शतकाला गवसणी घातली.

स्कॉटलंड येथे सुरु असलेल्या अनधिकृत टी-२० क्रिकेट स्पर्धेत ग्लोसेंस्टरशायर 2nd एकादश आणि बाथ सीसी या संघांमध्ये सामना खेळवण्यात आला होता. त्यात मुन्सीने ३९ चेंडूंत १४७ धावांची वादळी खेळी केली. ग्लोसेंस्टरशायर 2nd एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मुन्सीने जीपी विलोवसह ५३ चेंडूंत शतकी भागीदारी केली. विलोवने ३५ चेंडूंत नाबाद ७२ धावा केल्या.

स्कॉटलंडच्या फलंदाजाने चौकार – षटकारांची आतषबाजी केली. त्याने ५ चौकार व २० षटकार ठोकले. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये जलद शतकाचा विक्रम गेलच्या नावावर आहे, परंतु मुन्सीने पाच चेंडू कमी खेळून शतक ठोकले आणि गेलला मागे टाकले. मुन्सीच्या संघाने हा सामना ११२ धावांनी जिंकला.

टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम वैयक्तिक धावांचा विक्रम ख्रिस गेलच्या नाववर आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी नाबाद १७५ धावा चोपल्या होत्या. अफगाणिस्तान संघाने टी-२० क्रिकेटमधील सर्वोत्तम धावांचा विक्रम मोडताना आयर्लंडविरुद्ध ३ बाद २७८ धावा केल्या. त्यात हझरतुल्लाह झझाईसच्या नाबाद १६२ धावांचा समावेश होता.