जॉर्जियाचा ग्रँडमास्टर पँटसुलाया लीव्हानने सातव्या मुंबई महापौर चषक खुल्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पध्रेचे जेतेपद पटकावले. दहा फेऱ्यांच्या या स्पध्रेत लीव्हानने सर्वाधिक ८ गुणांची कमाई केली. भारतासाठी चांगले वृत्त म्हणजे आंतरराष्ट्रीय मास्टर हिमांशू शर्माने ग्रँडमास्टर किताबासाठी आवश्यक असलेला पहिला ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. त्याला या स्पध्रेत तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले, तर अ‍ॅलेकसेजला दुसरा क्रमांक मिळाला.
शर्मासहित ग्रँडमास्टर अ‍ॅलेक्सँड्राव्ह अ‍ॅलेकसेज (बेलारूस), ग्रँडमास्टर मखेड्लीश्वीली (जॉर्जिया), ग्रँडमास्टर अमोनातोव्ह फारूख (तजाकिस्तान) आणि ग्रँडमास्टर ओव्हेचकिन रोमन (रशिया) या पाच खेळाडूंनी प्रत्येकी साडेसात गुण कमावले.
एका गुणाच्या आघाडीनिशी अखेरच्या फेरीला सामोरा जाणाऱ्या लीव्हानने पराभवाचा धोका टाळण्यासाठी अमोनातोव्हा फारूखसोबत बरोबरी मान्य केली आणि अध्र्या गुणाच्या आघाडीसहित जेतेपदावर मोहोर उमटवली. दुसऱ्या पटावर काळ्या मोहऱ्यांनिशी खेळणाऱ्या हिमांशू शर्माने मिखेलविरुद्धची लढत बरोबरीत सोडवली.
दरम्यान, महिला ग्रँडमास्टर भक्ती कुलकर्णीने काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना ग्रँडमास्टर हरूतजुनायन गेव्होर्गला बरोबरीत रोखले आणि दुसरा आंतरराष्ट्रीय मास्टर नॉर्म प्राप्त केला.