पेनल्टी शूटआउटमध्ये १८ प्रयत्नांचा संघर्ष

जर्मनीचा मॅन्युएल न्युइर आणि इटलीचा गियानलुईगी बफन या जगातील दोन सर्वोत्तम गोलरक्षकांनी शनिवारी फुटबॉल चाहत्यांची मने जिंकली. १२० मिनिटांच्या खेळात जर्मनी आणि इटली यांच्यातील सामना १-१ असा बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेण्यात आला. अशा आव्हानात्मक आणि तितक्याच दडपणाच्या परिस्थितीत मॅन्युएल आणि बफन यांनी आपली कामगिरी चोख बजावत सामन्यातील उत्कंठा शिगेला पोहोचवली होती. मात्र खेळ म्हटला की जय-पराजय आलेच. जोनस हेक्टरच्या निर्णायक स्पॉट-किक्च्या जोरावर जोकीम लो यांच्या मार्गदर्शनाखालील जर्मनी संघाने युरो चषक फुटबॉल स्पध्रेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला. या नाटय़पूर्ण लढतीत जर्मनीने ६-५ असा विजय मिळवला.

बोर्डेऑक्स येथे शनिवारी मध्यरात्री खेळवण्यात आलेल्या या लढतीत पेनल्टी शूटआउटमध्ये एकूण १८ प्रयत्न झाले आणि त्यात सात खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. सिमोन झाझा, ग्रॅझिआनो पेल्ले, लिओनाडरे बोनुस्सी आणि मॅटेओ डॅर्मियन या इटलीच्या खेळाडूंना, तर थॉमन म्युलर, मेसूट ओझील आणि कर्णधार बॅस्टियन श्वेन्स्टायगर या जर्मनीच्या खेळाडूंना स्पॉट-किक्चे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. पहिल्या सत्रातील रटाळ खेळात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला.

मध्यंतरानंतर मात्र दोन्ही संघांनी आक्रमक सुरुवात करताना प्रेक्षकांना खिळवून ठेवले. ओझीलने ६५व्या मिनिटाला गोल करत जर्मनीला विजयी मार्गावर आणले, परंतु बोनुस्सीने ७८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. त्यानंतर निर्धारित ९० मिनिटांत ही बरोबरी कायम राहिली. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मॅन्युएल व बफन यांनी अभेद्य भिंत उभी करताना प्रतिस्पर्धीना गोल करण्यापासून रोखले. पेनल्टी शूटआउटमध्येही नाटय़मय घडामोडींनंतर जर्मनीने ६-५ अशी बाजी मारली. उपांत्य फेरीत त्यांच्यासमोर यजमान फ्रान्स आणि आइसलँड यांच्यातील विजेत्याचे आव्हान असेल.

  • ३४ : जर्मनी आणि इटली यांच्यात आत्तापर्यंत ३४ सामने खेळवण्यात आले. त्यापैकी इटलीने सर्वाधिक १५ विजय मिळवले असून जर्मनीला ९ विजयांवर समाधान मानावे लागले. १० लढती अनिर्णित राहिल्या.
  • ४४० : गिअ‍ॅनलुईगी बफनची अभेद्य भिंत ४४० मिनिटांनंतर प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूंना ओलांडण्यात अपयश आले.
  • ५५८ : लिओनार्डो बोनूस्सीने गोल करून जर्मनीचा गोलरक्षक मॅन्युएल न्युइरच्या  ५५८ मिनिटांच्या बचावाला तडा दिला.
  • २० : मेसूट ओझीलने जर्मनीकडून २०व्या गोलची नोंद केली. जर्मनीकडून २० किंवा त्याहून अधिक गोल करणारा तो सहावा खेळाडू आहे. याआधी लुकास पोडोलस्कीने सर्वाधिक ४८ गोल केले आहेत, त्यापाठोपाठ थॉमस म्युलर (३२), मारियो गोमेझ (२९), श्वेनस्टायगर (२४) आणि अ‍ॅड्रे शुरले (२०) यांचा क्रमांक येतो.

निराशाजनक कामगिरीमुळे रडलो. या अभूतपूर्व अनुभवाने आम्हाला आणि आमच्या चाहत्यांना पुनरुज्जीवित केले. जर्मनीसारख्या संघाकडून तीन पेनल्टीच्या संधी हुकणे, हे वाईट आहे आणि तरीही आम्हाला विजय मिळवता आला नाही. परिस्थिती अजून बिकट होत गेली. काही वेळा सामना आमच्या बाजूने होता, तर काही वेळा नाही. हा खेळाचा भाग आहे आणि त्याचा स्वीकार केला पाहिजे. पश्चात्तापाशिवाय आम्हाला स्पध्रेचा निरोप घ्यायचा होता आणि आम्ही तसे केले. चाहत्यांना आमचा अभिमान वाटावा असा खेळ आम्ही केला.

–  गिअ‍ॅनलुईगी बफन, इटलीचा कर्णधार

 

1

2

3