युरो २०१६ स्पध्रेच्या दिशेने आगेकूच * स्कॉटलंडवर विजय मिळवत ‘ड’ गटात अव्वल
विश्वविजेत्या जर्मनीने युरो फुटबॉल स्पध्रेच्या पात्रता फेरीत ‘ड’ गटात अव्वल स्थान अबाधित राखताना युरो चषक स्पध्रेच्या दिशेने भरारी घेतली आहे. पात्रता फेरीत हॅम्पडेन पार्कवर झालेल्या सामन्यात जर्मनीने ३-२ अशा फरकाने स्कॉटलंडचा पराभव केला आणि १९ गुणांसह गटातील अव्वल स्थान कायम राखले. या विजयामुळे जर्मनीचे युरो स्पध्रेसाठीचे स्थान जवळपास निश्चित झाले आहे, तर स्कॉटलंडची चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे.
सामन्याच्या सुरुवातीपासून चेंडूवर ताबा मिळवणाऱ्या जर्मनीने १८व्या मिनिटाला थॉमस म्युलरने केलेल्या गोलच्या बळावर १-० अशी आघाडी घेतली. मात्र, मॅट्स हुम्मेल्सच्या स्वयंगोलने स्कॉटलंडला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली, परंतु फार काळ त्यांना या गोलचा आनंद साजरा करता आला नाही. म्युलरने ३४व्या मिनिटाला दुसरा गोल करताना पुन्हा आघाडी मिळवली. दोन्ही संघांमध्ये रंगलेली चुरस पाहून प्रेक्षकांमध्येही उत्साह संचारला होता. ४३व्या मिनिटाला जेम्स मॅकआर्थरने स्कॉटलंडसाठी गोल करून मध्यंतरापर्यंत सामना २-२ असा चुरशीचा बनवला.
मध्यंतरानंतर म्युलरने दिलेल्या पासवर इकाय गंडोगॅन याने गोल करून संघाला पुन्हा आघाडीवर आणले. या वेळी मात्र स्कॉटलंडला बरोबरी साधण्यात अपयश आले आणि त्यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे स्कॉटलंडचे
युरो चषकातील स्थान धोक्यात आले आहे.
याच गटात पोलंडने ८-१ अशा फरकाने जिब्राल्टरचा धुव्वा उडवून दुसरे स्थान पटकावले आहे, तर आर्यलडने जॉर्जिआवर १-० असा विजय मिळवून तिसरे स्थान काबीज केले.
पोलंडच्या विजयात कॅमिल ग्रोसिस्की (८ व १५ मि.), रॉबर्ट लेवांडोवस्की (१८ व २९ मि.), अर्काडीस्ज मिलिक (५६ व ७२ मि.) यांच्या प्रत्येकी दोन गोलने, तर जाकुब ब्लासजीकोवस्की (५९ मि. पेनल्टी) व बाटरेज कॅपुस्त्का (७३ मि.) यांच्या प्रत्येकी एक गोलचा मोलाचा वाटा आहे. जिब्राल्टरकडून जॅक गॉस्लिंगने ८७व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

पोर्तुगालची आगेकूच
मिग्युएल व्हेलोसोने (९०+२ मि.)अतिरिक्त वेळेत गोल करून ‘आय’ गटात पोर्तुगाल संघाला अव्वल स्थानावर कायम राखले. व्हेलोसोच्या गोलने पोर्तुगालला अल्बानियावर १-० असा विजय मिळवून दिला. त्यामुळे पोर्तुगालने सहा सामन्यांत ५ विजय मिळवत १५ गुणांची कमाई केली आहे. एका लढतीत त्यांना पराभव पत्करावा लागला. याच गटात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेन्मार्कला सलग दुसऱ्यांदा गोलशून्य निकालावर समाधान मानावे लागल्याने युरो चषकात प्रवेश मिळवण्याचा त्यांना मार्ग खडतर झाला आहे. अर्मेनिया संघाने त्यांना गोलशून्य बरोबरीवर रोखले.