News Flash

जर्मनीकडून स्लोव्हाकियाचा धुव्वा

१९९६नंतर युरो चषक स्पध्रेच्या जेतेपदाच्या शोधात असलेल्या जर्मनीने आठव्या मिनिटाला आघाडी घेतली.

जर्मनीकडून स्लोव्हाकियाचा धुव्वा
गोमेझ

साखळी सामन्यात आक्रमकतेच्या अभावामुळे चाहत्यांचा रोष ओढावून घेतलेल्या विश्वविजेत्या जर्मनीने उपउपांत्यपूर्व फेरीत सुरुवातीपासून आक्रमक खेळ करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. स्लोव्हाकियाला जर्मनीच्या या बदललेल्या रणनितीचा अंदाज बांधण्यात अपयश आले. आक्रमक खेळ करणाऱ्या जर्मनीने ३-० अशा फरकाने विजय मिळवताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला.

१९९६नंतर युरो चषक स्पध्रेच्या जेतेपदाच्या शोधात असलेल्या जर्मनीने आठव्या मिनिटाला आघाडी घेतली. स्लोव्हाकियाची बचावफळी भेदून जेरोम बोएटेंगने व्हॉलीद्वारे पहिला गोल नोंदवला. १२व्या मिनिटाला संघाच्या आघाडीत भर घालण्याची संधी जर्मनीला मिळाली. पेनल्टी क्षेत्रात आक्रमणपटूला स्लोव्हाकियाच्या मार्टीन स्क्रीटेल धक्का दिल्यामुळे जर्मनीला पेनल्टी देण्यात आली, परंतु मेसूट ओझीलचा गोल करण्याचा प्रयत्न स्लोव्हाकियाचा गोलरक्षक मॅटूस कोझासिकने हाणून पाडला. आक्रमणावर भर देणाऱ्या जर्मनीने चेंडूवर सर्वाधिक काळ ताबा ठेवताना स्लोव्हाकियाला हतबल केले. ४१व्या मिनिटाला त्यांनी गोल करण्याची संधी निर्माण केली. मात्र, यावेळी जर्मनीचा गोलरक्षक न्युएरने त्यांना रोखले. दोनच मिनिटांत जर्मनीकडून मारीयो गोमेझने गोल करून मध्यंतराला २-० अशी आघाडी घेतली.

दुसऱ्या सत्रात स्लोव्हाकियाला फार संघर्ष करण्याची संधी न देता जर्मनीने सामन्यावरील पकड मजबूत केली. ६३व्या मिनिटाला ज्युलियन ड्रॅझलरने अप्रतिम गोल करताना जर्मनीची आघाडी ३-० अशी भक्कम केली. त्यानंतर जर्मनीने उर्वरित खेळात बचावात्मक खेळावर भर ठेवत आघाडी कायम राखली आणि विजयावर शिक्कामोर्तब करताना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व लढतीमध्ये जर्मनीला स्पेन आणि इटली यांच्यातील विजेत्या संघाशी सामना करावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2016 5:41 am

Web Title: germany beat slovakia
Next Stories
1 Pro Kabaddi league: बंगाल वॉरियर्सचा दिल्लीवर विजय
2 VIDEO: …आणि लिओनेल मेस्सीला अश्रू अनावर
3 निवृत्ती मेस्सीची, पण ट्विटर ट्रेण्डमधे शाहिद आफ्रिदी!
Just Now!
X