गतविजेत्या पोर्तुगालवर ४-२ अशा फरकाने विजय

वृत्तसंस्था, म्युनिक

फ्रान्सविरुद्ध स्वयंगोलमुळे पराभवाची नामुष्की ओढवलेल्या जर्मनीला पोर्तुगालविरुद्ध दोन स्वयंगोलमुळेच तारले. दोन्ही बलाढय़ संघांमध्ये रंगलेल्या उत्कंठावर्धक सामन्यात जर्मनीने गतविजेत्या पोर्तुगालवर ४-२ असा विजय मिळवत युरो चषक फुटबॉल स्पर्धेतील आव्हान कायम राखले.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने १८व्या मिनिटालाच शानदार गोल करत पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली होती. पिछाडीवर पडल्यानंतर जर्मनीचा संघ सातत्याने प्रतिहल्ले चढवत पोर्तुगालच्या बचावपटूंवर दडपण आणत होता. त्याचाच फायदा जर्मनीला झाला. ३५व्या मिनिटाला रुबेन डायस आणि ३९व्या मिनिटाला राफाएल गुरेरो यांनी केलेल्या स्वयंगोलमुळे जर्मनीला पहिल्या सत्रात २-१ अशी आघाडी घेता आली.

जर्मनीने दुसऱ्या सत्रातही आक्रमणाची धार वाढवली. ५१व्या मिनिटाला काय हॅवर्ट्झ आणि ६०व्या मिनिटाला रॉबिन गोसेन्सने गोल करत पोर्तुगालच्या आक्रमणातील हवा काढून घेतली. ६७व्या मिनिटाला पोर्तुगालच्या दिएगो जोटाने गोल केला.

या विजयामुळे जर्मनी फ-गटात तीन गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला असून पोर्तुगालची तीन गुणांनिशी तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे. हंगेरीविरुद्ध बरोबरी पत्करत फ्रान्स  चार गुणांसह अग्रस्थानावर आहे.

इंग्लंडची स्कॉटलंडशी बरोबरी

लंडन : जवळपास दोन दशकांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेत खेळणाऱ्या स्कॉटलंडने शुक्रवारी मध्यरात्री बलाढय़ इंग्लंडला गोलशून्य बरोबरीत रोखले. इंग्लंडचे आक्रमण सुरुवातीपासूनच थोपवून धरत स्कॉटलंडच्या बचावपटूंनी दमदार कामगिरी केली. स्कॉटलंडने गोल करण्याचेही प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही.क्रोएशियाला सलामीच्या सामन्यात नमवल्यानंतर आता इंग्लंडचे चार गुण झाले असून ते चेक प्रजासत्ताकनंतर (४ गुण) दुसऱ्या स्थानी आहेत.

हंगेरीने फ्रान्सला बरोबरीत रोखले

बुडापेस्ट : हंगेरीने दमदार कामगिरीचे प्रदर्शन करत युरो चषक फुटबॉल स्पर्धेत जगज्जेत्या फ्रान्सला १-१ असे बरोबरीत रोखले. अ‍ॅटिला फिओलाने पहिल्या सत्रातच हंगेरीला आघाडी मिळवून दिली होती. मात्र अँटोनी ग्रिझमनने ६६व्या मिनिटाला गोल करत फ्रान्सला बरोबरी साधून दिली. जर्मनीविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यामुळे फ्रान्सने चार गुणांसह आघाडी घेतली आहे. हंगेरीच्या खात्यावर एक गुण जमा आहे.