करोनामुळे लांबणीवर पडलेली आणि इस्तंबूलमधून अन्यत्र खेळवण्यात येणाऱ्या चॅम्पियन्स फुटबॉल लीगच्या अंतिम फेरीच्या सामन्याच्या आयोजनासाठी आता जर्मनी आणि पोर्तुगाल या दोन देशांमध्ये चुरस रंगली आहे.

ऑगस्टमध्ये होणाऱ्या या अंतिम फेरीच्या आयोजक देशाचा निर्णय १७ जून रोजी युरोपियन फुटबॉल महासंघाच्या (यूएफा) कार्यकारी समितीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. त्याचबरोबर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फे रीच्या सामन्यांच्या आयोजक देशांचाही निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे. खेळाडू तसेच पदाधिकाऱ्यांना सहजपणे जाता येईल, अशा देशाचा पर्यायाने विचार केला जाणार आहे. या सामन्यांसाठी चाहत्यांना परवानगी देण्यात येणार नाही, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

पोर्तुगाल फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष मार्सेलो रिबेलो डे सौसा यांनी ऑगस्ट महिन्यात अंतिम फेरीचा सामना पोर्तुगालमध्येच आयोजित केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. लिस्बनमधील दोन स्टेडियम्स सज्ज ठेवण्यात आली असून बेनफिका स्टेडियमवर अंतिम फेरी आयोजित करण्याचा आमचा विचार आहे, असे मार्सेलो यांनी सांगितले. जर जर्मनीची निवड झाली तर फ्रॅँकफर्ट हे लढत आयोजित करण्यासाठी योग्य पर्याय असेल असेही बोलले जात आहे.

मार्च महिन्यात चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी इस्तंबूलमधील आर्टिक ऑलिम्पिक स्टेडियममध्ये रंगणार होती. मात्र आता हे ठिकाण बदलण्यात आल्याचे समजते. आता अंतिम फेरी ही त्रयस्थ ठिकाणी खेळवण्यात येणार आहे. मात्र उपांत्यपूर्व, उपांत्य आणि अंतिम फेरीचे सामने एकाच देशात आयोजित करण्यात येणार आहेत.