पहिले दोन सामने जिंकल्यानंतर भारताचा आत्मविश्वास उंचावला असला तरी काही खेळाडूंच्या दुखापतीमुळे कमकुवत झालेल्या भारतास मंगळवारी चॅम्पियन्स चषक हॉकी स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जर्मनीच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. जर्मनीस सोमवारी इंग्लंडने पराभवाचा धक्का दिला होता.  
भारताने पहिल्या दोन लढतींमध्ये इंग्लंड व न्यूझीलंड यांच्यावर मात करीत साखळी गटात आघाडी स्थान घेतले आहे. या लढती जिंकल्यामुळे भारताची बाजू वरचढ झाली असली तरी तीन खेळाडूंच्या दुखापतींनी भारतास काळजीत टाकले आहे. मध्यरक्षक मनप्रितसिंग व आक्रमण फळीतील खेळाडू एस.व्ही.सुनील यांना न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत दुखापती झाल्या आहेत. कर्णधार सरदारासिंग याचा खांदा दुखावला आहे.
साखळी ‘अ’ गटात दोन्ही सामने जिंकणारा भारत हा एकमेव संघ आहे. इंग्लंड व जर्मनी यांचे दोन सामन्यांमध्ये प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. साखळी ‘ब’ गटात गतविजेता ऑस्ट्रेलिया व नेदरलँड्स यांचे प्रत्येकी चार गुण झाले आहेत. त्यांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे तर एक सामना बरोबरीत ठेवला आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मनप्रित याच्या जबडय़ावर प्रतिस्पर्धी खेळाडूची स्टिक बसली होती. त्यामुळे त्याला दहा ठिकाणी टाके घालावे लागले आहे. मात्र तो जर्मनीविरुद्धच्या लढतीत खेळेल अशी आशा व्यक्त करीत भारताचे प्रशिक्षक मायकेल नॉब्ज म्हणाले, त्याच्या सहभागाबाबत आम्ही सामन्यापूर्वी अंतिम निर्णय घेणार आहोत. सुनील याला स्नायूंच्या वेदनांचा त्रास होत असून उद्या सामन्यापूर्वी तो तंदुरुस्त होईल अशी अपेक्षा आहे. जर्मनीने या स्पर्धेत आतापर्यंत नऊ वेळा विजेतेपद मिळविले आहे. येथे पहिल्या लढतीत त्यांनी न्यूझीलंडवर मात केली होती, मात्र इंग्लंडविरुद्ध त्यांना लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला होता.