विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी जर्मनीला यजमान ब्राझीलचे आव्हान पार करायचे आहे. मात्र प्रत्यक्ष मैदानावर भिडण्यापूर्वी त्यांना ब्राझीलमधलील काळी जादू करणाऱ्या मंडळींची शक्ती रोखण्याचे आव्हान आहे. ब्राझीलमध्ये काळ्या जादूचे प्रयोग करणाऱ्या मंडळींनी जर्मनीचा विजयवारू रोखण्यासाठी आपल्या शक्तीचा प्रयोग करण्याचे ठरवले आहे. ‘‘माझ्या शापामुळे जोअ‍ॅकिम लो यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या जर्मनीच्या संघाची आगेकूच थांबेल. माझ्या शक्तीद्वारे जर्मनीच्या प्रमुख खेळाडूचे पाय मी बांधून ठेवीन. सामन्यापूर्वी एका समारंभाद्वारे एका छोटय़ा बाहुलीद्वारे हा शाप देण्यात येईल,’’ असा दावा काळ्या जादूचे अभ्यासक हेलिओ स्लिमन यांनी केला आहे. तंत्रज्ञानाचे दररोज नवनवे आविष्कार समोर येत असताना २१व्या शतकात हा अघोरी मार्ग ब्राझीलला तारणार का, हा प्रश्नच आहे. काळ्या जादूच्या या बुवांनी कोलंबियाच्या जेम्स रॉड्रिगेझला रोखण्यासाठी आपली शक्ती खर्ची घातली होती. मात्र युवा जेम्सच्या गोल करण्याच्या क्षमतेवर कोणताही परिणाम झाला नाही. सर्वसमावेशक खेळासाठी ओळखला जाणारा जर्मनीचा संघ या काळ्या जादूला कसे रोखणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.