भारतीय संघाचे माजी जलदगती गोलंदाज करसन घावरी यांनी मोहम्मद शमी हा विश्वचषकासाठीच्या भारतीय संघात असणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केलं आहे. मे महिन्यात इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यामध्ये शमीने आपल्या भेदक गोलंदाजीमुळे भल्याभल्या फलंदाजांची भंबेरी उडवली होती.

अवश्य वाचा – IND vs NZ : …..म्हणून पहिल्या टी-20 सामन्यात भारत पराभूत, कृणाल पांड्याने सांगितलं कारण

“मोहम्मद शमी च्या गोलंदाजीत आता अधिक सुधारणा झाली आहे. गेल्या दोन वर्षात त्याने अनेक समस्यांचा सामना करुन स्वतःला सिद्ध केलं आहे. सध्या तो सर्वोत्तम गोलंदाजी करतोय. आगामी विश्वचषकासाठी त्याचं भारतीय संघात असणं अत्यंत गरजेचं आहे. तो भारताचा महत्वाचा गोलंदाज ठरु शकतो.” घावरी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

अवश्य वाचा – भारत दौऱ्याआधी कांगारुंना मोठा धक्का, मिचेल स्टार्क दुखापतीमुळे बाहेर

नुकताच मोहम्मद शमीने वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 100 बळी घेण्याचा विक्रम केला आहे. त्यामुळे आपला फॉर्म टिकवून ठेवायचा असल्यास शमीला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत राहणं गरजेचं असल्याचं घावरी म्हणाले. “शमीकडे चेंडू हवेत वळवण्याचं चांगलं कसब आहे. त्याचा टप्पाही सुरेख आहे, याचसोबत त्याने यॉर्कर चेंडू अधिक चांगल्या पद्धतीने टाकणं शिकायला हवं. याचा भारतीय संघाला फायदाच होईल.” घावरींनी शमीच्या गोलंदाजीचं कौतुक केलं.