महाघोटाळ्याने ग्रासलेल्या फिफाला स्वित्र्झलडच्या जियानी इन्फँटिनो यांच्या रुपात नवा अध्यक्ष मिळाला आहे. झुरिच येथे आयोजित फिफाच्या विशेष सर्वसाधारण परिषदेत अध्यक्षपदासाठी पाच उमेदवार रिंगणात होते. पहिल्या फेरीअखेर अध्यक्षपदाचा विजयी उमेदवार स्पष्ट होऊ शकला नाही. दुसऱ्या फेरीत इन्फँटिनो यांनी ११५ मते मिळवली. अध्यक्षपदासाठीचे प्रबळ दावेदार बहरिनचे शेख सलमान बिन इब्राहिम अल खलिफा यांना ८८ मते मिळाली. प्रिन्स अली बिन अल हुसेन यांना चार मते मिळाली. जेरोम कँपेन यांना एकही मत मिळाले नाही, तर मतदानापूर्वी टोकियो सेक्सवाले यांनी माघार घेतली.

अध्यक्षपदासाठी ५० टक्के अर्थात १०४ मतांची गरज होती. फिफाशी संलग्न २०७ संघटनांच्या प्रतिनिधींनी मतदान केले. ११५ मतांसह इन्फँटिनो यांच्या अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब झाले. महाघोटाळ्यानंतर अध्यक्षपद सोडावे लागलेले ब्लाटरही स्वित्र्झलडचेच होते. प्रक्षेपण हक्क वितरण, आर्थिक हितसंबंध, विश्वचषक आयोजन अधिकार वितरण तसेच तिकीट  विक्री भ्रष्टाचार प्रकरणी अध्यक्ष  ब्लाटर यांना पदावरून दूर करण्यात आले होते. त्यानंतर फिफाच्या अध्यक्षपदासाठी जगभरातील पाच प्रभावी फुटबॉल संघटक शर्यतीत होते. अखेरच्या टप्प्यात निवडणुकीचे ‘युरोप विरुद्ध आशिया’ असे वर्णन केले जात होते. युएफाचे सरचिटणीस असताना इन्फँटिनो यांनी आर्थिक पारदर्शकता धोरण राबवले होते. युरो अजिंक्यपद स्पर्धेत संघांची संख्या १६वरून २४ नेण्यात त्यांचा मोठा वाटा होता. इन्फँटिनो यांच्यावर चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे वेळापत्रक सोयीनुसार बदलण्याचा आरोप आहे.

माझ्या भावना शब्दातीत आहेत. खडतर प्रवासानंतर मी या टप्प्यापर्यंत पोहचलो आहे. फिफाची प्रतिमा सुधारण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जगभरातल्या फुटबॉल चाहत्यांचा विश्वास कमावण्याचे आमचे ध्येय आहे. सर्वाना एकत्र घेऊन फुटबॉलला केंद्रस्थानी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. फिफा संघटनेचा गेले काही वर्ष वाईट कालखंड सुरू आहे. त्यातून बाहेर पडत पारदर्शी आणि उत्तम प्रशासन राबवणे आमचे उद्दिष्ट आहे.

-जियानी इन्फँटिनो