मैदानावरील पंचांची कामगिरी अधिकाधिक अचूक व्हावी या दृष्टीने २०१८ च्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेपासून व्हिडीओ तंत्रज्ञानाचा उपयोग केला जाणार आहे, असे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष गिआनी इन्फँटिनो यांनी सांगितले. ही स्पर्धा रशियात आयोजित केली जाणार आहे.
स्पर्धेच्या तयारीची पाहणी करण्यासाठी इन्फँटिनो येथे आले आहेत. त्यांनी येथील तयारीविषयी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, ‘रशियाला आर्थिक समस्यांनी ग्रासले असले तरी ही स्पर्धा यशस्वीरीत्या आयोजित केली जाईल, तसेच स्पर्धेद्वारे रशियातील पर्यटन व अन्य उद्योग व्यवसायांना चालना मिळेल.’
व्हिडीओ तंत्रज्ञानाविषयी इन्फँटिनो यांनी सांगितले, ‘ही यंत्रणा व्यवस्थितरीत्या कार्यान्वित होण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागणार आहे. स्पर्धेपूर्वी त्याची चाचणी घेतली जाईल. या तंत्रज्ञानाचा उपयोग गोल झाल्याचा क्षण, लाल कार्ड्स, पेनल्टी व अन्य महत्त्वाच्या क्षणांचा आढावा घेण्यासाठी होणार आहे.’
व्हिडीओ साहाय्यक पंचाकडे सामन्याच्या चित्रीकरणाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी राहील. मैदानावरील पंचांनी विनंती केल्यानंतर एखाद्या क्षणाचा आढावा घेतला जाईल.
आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटना मंडळाने (आयएफएबी) व्हिडीओ तंत्रज्ञानाबाबत दोन वर्षे आढावा घेण्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे. २०१८ च्या विश्वचषक स्पर्धेपासून या तंत्रज्ञानाचा अधिकृतरीत्या उपयोग करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
मॉस्को, सेंट पीट्सबर्ग, कझान, सोची आदी अकरा शहरांमध्ये विश्वचषक स्पर्धेचे सामने आयोजित केले जाणार आहेत.