सायना नेहवालच्या ऑलिम्पिक पदकानंतर भारतीय बॅडमिंटनचे चित्र पालटेल असे सकारात्मक चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात मात्र सायनासह भारतीय बॅडमिंटनपटूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील तीव्र स्पर्धेला सामोरे जाण्यात अडचणी येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्वालालंपूर येथे सुरू असलेल्या मलेशियन सुपर सीरिज स्पर्धेत सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू आणि पारुपल्ली कश्यप यांचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले होते. युवा कदंबी श्रीकांत हा या स्पर्धेत भारताचे एकमेव प्रतिनिधित्व करणारा खेळाडू उरला होता, मात्र शुक्रवारी श्रीकांतलाही पराभवाला सामोरे जावे लागल्याने भारताचे या स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले आहे. चौथ्या मानांकित इंडोनेशियाच्या टॉमी सुगिर्तोने श्रीकांतवर २१-१०, २१-१५ असा विजय मिळवला. डिसेंबरमध्ये राष्ट्रीय विजेता ठरलेल्या श्रीकांतने दुसऱ्या फेरीपर्यंत दोन अव्वल खेळाडूंना नमवण्याची किमया केली होती, मात्र सुर्गितोविरुद्धच्या लढतीत त्याला आपले कौशल्य दाखवता आले नाही. पहिल्या गेममध्ये ३-३ अशी बरोबरी होती. मात्र सुर्गितोने सातत्याने आघाडी वाढवत पहिला गेम नावावर केला. दुसरा गेम चुरशीचा ठरला. १५-१५ अशा बरोबरीतून सुर्गितोने सलग सहा गुणांची कमाई करत उपांत्य फेरीत धडक मारली.