गाइल्स शील्ड क्रिकेट स्पर्धेतील (१४ वर्षांखालील) मंगळवारचा दिवस आयुष वैती आणि प्रेम गोहिल या गोलंदाजांनी गाजवला. मध्यमगती गोलंदाज आयुषने ३७ धावांत मिळवलेल्या पाच बळींच्या जोरावर बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलने मुलुंडच्या आयईएस सेकंडरी स्कूलचा नऊ गडी राखून धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना आयुषच्या पाच बळींमुळे आयईएसचा डाव ११२ धावांत आटोपला. प्रत्युत्तरात क्रिश कनावडे (५०) आणि प्रणय कपाडिया (नाबाद ५१) यांच्या अर्धशतकांमुळे स्वामी विवेकानंद स्कूलने एका फलंदाजाच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य गाठले.

दुसऱ्या सामन्यात प्रेमने २६ धावांत सहा बळी मिळवून कांदिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. प्रेमला दिव्यांश शेट्टीने तीन बळी मिळवून उत्तम साथ दिल्यामुळे माटुंगा प्रीमियर स्कूलचा संघ ७० धावांत गारद झाला. प्रणव सावंतमुळे (नाबाद ४३) स्वामी विवेकानंदने एकही गडी न गमावता विजय मिळवला.