मुंबई : २००४-०५नंतर प्रथमच बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद शाळेने गुरुवारी गाइल्स शील्ड क्रिकेट स्पर्धेच्या (१४ वर्षांखालील) विजेतेपदावर मोहोर उमटवली. अंतिम सामन्यात त्यांनी कुल्र्याच्या गतविजेत्या अल बरकत स्कूलवर पहिल्या डावातील २९ धावांच्या आघाडीच्या बळावर मात केली.

मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात बुधवारीच स्वामी विवेकानंद शाळेने आयुष वैतीच्या (९५) अर्धशतकामुळे पहिल्या डावात आघाडी घेतली होती. गुरुवारी अल बरकत स्कूलने बिनबाद १२ धावांवरून पुढे खेळताना दुसरा डाव १ बाद १८६ धावांवर घोषित केला. त्यामुळे स्वामी विवेकानंद शाळेपुढे विजयासाठी १५७ धावांचे आव्हान उभे ठाकले. मात्र स्वामी विवेकानंद शाळेने कोणतेही दडपण न घेता दुसऱ्या डावात ३६ षटकांत २ बाद ९१ धावा केल्या. मग निकाल लागणे अशक्य असल्याने विवेकानंद शाळेला विजयी घोषित करण्यात आले. अल बरकत स्कूलचा यासिन शेख स्पर्धेतील सवरेत्कृष्ट फलंदाज, तर स्वामी विवेकानंद शाळेचा रुद्र टंक सर्वोत्तम गोलंदाज ठरला.

सर्फराजच्या शतकात मुंबईचा खडूसपणा -वेंगसरकर

क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात त्रिशतक झळकावणे, हे कौतुकास्पदच असून सर्फराज खानने साकारलेल्या त्रिशतकादरम्यान मुंबईतील खडूसपणा दिसून आला, अशी प्रतिक्रिया भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी पारितोषिक वितरणाप्रसंगी व्यक्त केली. ‘‘त्रिशतक कोणत्याही प्रकारातील असले तरी त्याची तुलना अन्य कोणत्याही खेळीशी होऊ शकत नाही. त्यामुळेच सर्फराजचे जितके कौतुक करावे तितके कमीच आहे. विशेष म्हणजे प्रतिस्पर्धी संघाने ६०० धावांचा डोंगर रचलेला असताने त्याने न डगमगता संघाला सावरले. मुंबईच्या खेळाडूंकडून अशीच जिद्द आणि खडूसपणा मला अपेक्षित आहे,’’ असे वेंगसरकर म्हणाले.

आमच्या संघामध्ये अनेक गुणवान खेळाडू असले तरी अंतिम फेरीपर्यंत मजल मारू, असेही मला वाटले नव्हते. आयुष-सोहमच्या भागीदारीमुळे सामन्याला कलाटणी मिळाली. त्यांच्यामुळे हे विजेतेपद नेहमीच स्मरणात राहिल. त्याशिवाय प्रत्येक खेळाडूने वेळोवेळी कामगिरी उंचावल्यामुळेच हे यश साध्य झाले.– महेश लोटलीकर,स्वामी विवेकानंद शाळेचे प्रशिक्षक

रुद्र टंकच्या अनुपस्थितीत मला संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. परंतु प्रत्येक खेळाडूला जबाबदारीची जाणीव असल्यामुळे मला फारसे परिश्रम घ्यावे लागले नाहीत. प्रशिक्षकांनी दडपणाच्या परिस्थितीत केलेले मार्गदर्शन मोलाचे ठरले. गतविजेत्या संघाला पराभूत केल्यामुळे मी फार आनंदी आहे. – प्रणय कपाडिया, स्वामी विवेकानंद शाळेचा कर्णधार