माजी कर्णधार आणि विश्वविजेता एम.एस धोनीनं १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी क्रिकेटला रामराम ठोकला. २०१९ विश्वचषकात उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. यानंतर सुमारे वर्षभर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. धोनीच्या निवृत्तीनंतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया दिल्या. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी बीसीसीआयला विनंती करतो की धोनीसाठी एक अखेरचा सामना आयोजित करावा. आता काँग्रेस आमदाराने धोनीला देशातील सर्वोच्च अशा भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करावे अशी विनंती केली आहे.

धोनीला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी मध्यप्रदेशमधील माजी मंत्री आणि क्राँग्रेस आमदार पी.सी शर्मा यांनी रविवारी केंद्रातील भाजपा सरकारकडे केली. शर्मा यांनी ट्विट करत ही मागणी केली आहे. पी.सी शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘भारतीय क्रिकेटला जगभरात विजेता म्हणून पुढे आणणारं देशाचं रत्न महान कर्णधार एम.एस. धोनीला भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यायला हवं. धोनी खेळातील भारतरत्न आहे. त्यानं क्रिकेटमध्ये देशाचं नाव मोठं केलं आहे. त्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानिक करण्यात यावं.’

भारतरत्न हा देशातील देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. हा सन्माम देशाची सेवा करणाऱ्यांना दिला जातो. यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा आणि क्रीडा या प्रकाराचा समावेश आहे. क्रीडा क्षेत्रात हा मान आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर यांना मिळाला आहे. धोनीच्या भरीव कामगिरीमुळे त्याला भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं अशी मागणी आता होत आहे. धोनीनं निवृत्तीची घोषणा केल्यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर भारतरत्नची मागणी केली होती.

भारतातच नव्हे तर जगातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये धोनीचं नाव घेतलं जातं. धोनी जगातील असा एकमेव कर्णधार आहे ज्यानं आयसीसीच्या तिन्ही चषकावर नाव कोरलं आहे. धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये भारतानं टी २० चा विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २०११ चा एकदिवसीय सामन्याचा विश्वचषक आणि २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीवर कोरलेलं नाव. हा पराक्रम कराणारा धोनी एकमेव कर्णधार आहे. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.