कसोटी संघाचा कर्णधार म्हणून विराट कोहलीला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी थोडासा वेळ देण्याची आवश्यकता असल्याचे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.
‘‘पुढील दोन-अडीच वर्षांत भारतात अनेक मालिकांचे आयोजन करण्यात आल्याने संघाला स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे. त्यानिमित्ताने विराटलाही कसोटी कर्णधार म्हणून स्थिरावण्याची संधी मिळेल आणि मला वाटते त्याला त्याची आवश्यकता आहे. कर्णधाराच्या भूमिकेत सुधारणा करण्याची संधी त्याला द्यायला हवी. त्यासाठी आपणही संयम बाळगायला हवा,’’ असे द्रविड म्हणाला.
बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत विराटच्या नेतृत्वाखाली भारताने आक्रमक सुरुवात केली, परंतु पावसाच्या व्यत्ययामुळे भारतीय संघाला फार काळ खेळण्याची संधी मिळाली नसल्याची खंत द्रविडने व्यक्त केली. भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी द्रविडवर सोपविण्यात आली आहे.
तो म्हणाला, ‘‘भारत ‘अ’ आणि १९ वर्षांखालील संघात निवड झालेल्या खेळाडूंना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळणार आहे आणि त्यानिमित्ताने निवड समितीला त्यांची दखल घेणे भाग पडणार आहे.’’ भारत ‘अ’ संघ जुलै आणि ऑगस्टमध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाविरुद्ध खेळणार आहे. या संघातील खेळाडूंना मार्गदर्श करण्यासाठी द्रविड उत्सुक आहे.