फुटबॉल हा खेळ लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वानाच वेड लावणारा. जिगरबाज खेळाने दिमाखदार प्रदर्शन करणाऱ्या फुटबॉलपटूंवर फिदा होणाऱ्या तरुणींची संख्याही अफाट. पैसा, प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या फुटबॉलपटूंच्या आयुष्याचा भाग होण्याची इच्छा अनेकींच्या मनी असते. झगमगीत ‘स्टारडम’ संस्कृती अनुभवण्यासाठी फुटबॉलपटूची साथीदार बनण्यासाठी त्या तयार असतात. दुसरीकडे स्पर्धाचे व्यस्त वेळापत्रक, प्रवास, दुखापती, चांगल्या कामगिरीचे आणि जिंकण्याचे दडपण, व्यावसायिक करार या सर्व चक्रव्यूहात फुटबॉलपटू एकटे पडलेले असतात. आपल्याला समजून आणि ऐकून घेणारे कोणीतरी हक्काचे असावे, प्रतिकूल परिस्थितीतही आपल्याला साथ देणारी कोणीतरी हवे ही भावना फुटबॉलपटूंच्या मनात प्रबळ होणारी. या दोन विचारातून एकत्र आलेल्या फुटबॉलपटू आणि त्यांच्या ग्लॅमरस अर्धागिनी यांची एक संस्कृतीच विकसित झाली. ‘वॅग्स’ (वाइफ अॅण्ड गर्लफ्रेंड) या विशेषनामाने दिग्गज फुटबॉलपटूंच्या हृदयावर राज्य करणाऱ्या नायिका ओळखल्या जातात.
रथी-महारथी फुटबॉलपटूंचा पैसा उधळण्याचा हक्काचा परवाना मिळालेल्या या ललना उच्च प्रतीची वस्त्रप्रावरणे, शॉपिंग, पाटर्य़ा, चमकोगिरी यामध्ये मश्गूल असतात. ‘वॅग्स’ होण्यासाठी काय करावं? असा आशयाची पुस्तके युरोपात प्रसिद्ध होऊ लागली. सुपरमॉडेल, अभिनेत्री, टीव्ही समालोचन अशा क्षेत्रांत काम करणाऱ्या तरुणी ‘वॅग्स’ होण्यात आघाडीवर आहेत. २००२मध्ये जर्मनीत झालेला फुटबॉल विश्वचषक ‘वॅग्स’ संस्कृतीच्या आक्रमणानेच गाजला. ‘बाडेन-बाडेन’ शहरात इंग्लंड फुटबॉलपटूंच्या ‘वॅग्स’नी केलेली पुरेपूर मजामस्ती सर्वाधिक चर्चेत राहिली. या चंगळवादामुळे इंग्लंडला उपांत्यपूर्व फेरीत गाशा गुंडाळावा लागल्याच्या वावडय़ा उठल्या होत्या. इंग्लंडच्या डेव्हिड बेकहॅमची पत्नी व्हिक्टोरिया बेकहॅम ही बहुचर्चित ‘वॅग्स’पैकीच एक आहे.


यंदाच्या विश्वचषकाच्या निमित्ताने ‘वॅग्स’ संस्कृतीत एक सकारात्मक बदल घडला आहे. ब्राझीलमध्ये विश्वचषक स्पध्रेदरम्यान फुटबॉलपटूंना साथ देणाऱ्या तारका आपापल्या क्षेत्रात नाव कमावलेल्या आहेत. फुटबॉलपटूंच्या पैशाकडे आकृष्ट होणाऱ्या त्या उथळ विचारांच्या तरुणी मुळीच नाहीत. इंग्लंडच्या फिल जोन्सची मैत्रीण काया हिल एमबीए झाली आहे. या पदवीला अनुरूप काम सुरू करण्याचा तिचा विचार आहे. गोलरक्षक बेनची पत्नी केट फोस्टर मानसशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहे. इंग्लंडच्याच ख्रिस स्मालिंगची मैत्रीण सॅम कोक ‘पेज-थ्री’ विश्वाचा भाग होती, पण आता ती दक्षिण आफ्रिकेतल्या एका स्वयंसेवी संस्थेसाठी काम करत आहे. फ्रेझर फोरस्टरची मैत्रीण लिआ टॉटन ब्राझीलमध्ये दाखल झाली आहे, परंतु आपल्या सौंदर्यप्रसाधने कंपनीची शाखा उघडण्यासाठीही ती तेवढीच प्रयत्नशील आहे. फ्रँक लॅम्पार्डची पत्नी ख्रिस्तिन ब्लिकले एक यशस्वी टीव्ही निवेदिका आहे.
विश्वचषकातील ‘वॅग्स’ संस्कृतीत अग्रक्रम लागतो तो स्पेनच्या गेरार्ड पिक्यू आणि त्याची पत्नी जगद्विख्यात पॉप गायिका शकिरा. २०१०च्या विश्वचषकात ‘वाका वाका’च्या तालावर जगाला ठेका धरायला लावणारी शकिरा पिक्यूला साथ देण्यासाठी ब्राझीलवारी करणार आहे. यंदाच्या विश्वचषक उद्घाटन सोहळ्यात शकिराची अनुपस्थिती प्रकर्षांने जाणवली. पिक्यूला साथ देण्याच्या निमित्ताने तिला पाहण्यासाठी फुटबॉलरसिक उत्सुक आहेत. ‘मेस्सीमॅनिया’ने भुरळ घातलेली अँटोनेला रॉक्युझो विश्वचषकाचे आकर्षण असणार आहे. बालपणीची मैत्रीण आणि आता साथीदार असलेली रॉक्युझो मेस्सीला पाठिंबा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असते. गोल करण्यापेक्षाही आपल्या व्यक्तिमत्त्वाने तरुणींना घायाळ करणारा ‘वंडरबॉय’ ख्रिस्तियानो रोनाल्डोलाही आपली जोडीदार मिळाली आहे. रशियातील सुपरमॉडेल इरिना श्याक रोनाल्डोला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असते.


हॉलीवूड चित्रपट अभिनेत्याप्रमाणे देखणेपण लाभलेल्या स्पेनच्या सर्जिओ रामोसला टीव्ही समालोचकाच्या रूपात आपली साथीदार मिळाली आहे. त्याचा सहकारी आणि सर्वोत्तम गोलरक्षकांपैकी एक आयकर कॅसिल्लाची कहाणीही अशीच काहीशी. सारा काबरेनेरो ही कॅसिल्लाची सहचारिणी एका वृत्तवाहिनीची क्रीडा पत्रकार आहे. गोलरक्षणापेक्षा साराकडेच लक्ष असल्याने आयकरची कामगिरी खालावली आणि स्पेनला २०१०च्या विश्वचषकात स्वित्र्झलडविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या टीकेकडे या जोडीने लक्ष दिले नाही. आयकरच्या सुरेख कामगिरीच्या बळावरच स्पेनने विश्वचषक जिंकला. विजयानंतर मुलाखत घेताना आयकर-सारा चुंबनदृश्य चांगलेच गाजले होते.
सलामीच्या लढतीत ब्राझीलला जिंकून देणाऱ्या २० वर्षीय नेयमारची सुपरमॉडेल गॅब्रिएला लेन्झी ही सखी आहे. नेदरलँड्सचा हरहुन्नरी खेळाडू वेस्ले स्नायडरची पत्नी योलांथे काबू अभिनेत्री आहे आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारविरोधी चळवळीसाठी ती कामही करते. इंग्लंडच्या संघाची ओळख असलेल्या वेन रुनीची पत्नी कुलन रुनी टीव्ही समालोचन आणि स्तंभलेखन करते. जर्मनीचा महत्त्वाचा खेळाडू मेस्युट ओझिलची जोडीदारीण मँडी कॅप्रिस्टो गायन, गीतलेखन आणि नृत्य व्यवसायात कार्यरत आहे. कोलंबियाचा भरवशाचा खेळाडू राडामेल फाल्को आणि पत्नी लोरेई टारोन या दोघांमध्ये तिसऱ्याच्या चर्चेने गदारोळ झाला होता. अतरंगी वर्तनासाठी प्रसिद्ध इटलीचा मारिओ बालोटेलीची आणि त्याची मैत्रीण फॅनी नेग्युेशा यांच्यातील नाते संपुष्टात येणार होते, परंतु पुन्हा या दोघांनी एकमेकांचीच निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असे म्हणतात. विश्वचषकाच्या निमित्ताने ब्राझीलमध्ये ‘वॅग्स’चे तारकामंडळ अवतरले आहे. आता कुणाची साथ कोणाला लाभदायक ठरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.