ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेल सध्या चांगलाच फॉर्मात आहे. भारताविरुद्ध मालिकेत आणि युएईमध्ये झालेल्या पाकिस्तानविरुद्ध मालिकेत मॅक्सवेलने आपल्या फलंदाजीचा प्रतिस्पर्धी गोलंदाजांना चांगलाच तडाखा दिला. त्याच्या या खेळामुळे प्रशिक्षक जस्टीन लँगर चांगलेच प्रभावित झाले आहेत. मॅक्सवेलमध्ये विराट कोहली सारखा खेळाडू बनण्याची क्षमता असल्याचं लँगर यांनी म्हटलं आहे.

“मॅक्सवेल सध्या 32 किंवा 33 च्या सरासरीने फलंदाजी करतो आहे. त्याच्यात विराट कोहलीसारखा खेळाडू बनण्याची क्षमता आहे. हे त्याच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे. तो गुणी खेळाडू आहे, आणि याची कल्पना त्याला पुरेपूर आहे. आगामी काळात मॅक्सवेलसमोर वन-डे आणि कसोटी क्रिकेटमधला सर्वोत्तम खेळाडू बनण्याचं ध्येय असणार आहे.” लँगर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

“मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियाच्या संघाचा महत्वाचा हिस्सा आहे. फलंदाजी, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण…तो त्याच्या मैदानातील वावरामुळे संघात एक चैतन्य निर्माण करतो.” लँगर यांनी मॅक्सवेलचं कौतुक केलं. ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्यात मॅक्सवेलच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर पाहुण्या संघाने टी-20 आणि वन-डे अशा दोन्ही मालिकांमध्ये बाजी मारली. यानंतर पाकिस्तानविरुद्धच्या 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेतही ऑस्ट्रेलियाने बाजी मारली.