ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनिश्चीत काळासाठी विश्रांती घेतली आहे. गेले काही दिवस आपलं मानसिक स्वास्थ्य ठिक नसल्याचं सांगत मॅक्सवेलने लंकेविरुद्ध टी-२० मालिकेतून माघार घेतली. याचसोबत पाकिस्तानविरुद्ध आगामी टी-२० मालिकेतही मॅक्सवेल खेळू शकणार नाहीये. श्रीलंकेविरुद्ध पहिल्या दोन टी-२० सामन्यात मॅक्सवेलला संघात स्थान देण्यात आलं होतं.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानेही मॅक्सवेलला आपला पाठींबा दर्शवला आहे. “आमच्या खेळाडूचं शाररिक आणि मानसिक स्वास्थ्य जपणं हे आमचं कर्तव्य आहे. ग्लेनच्या तब्येतील लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी आम्ही त्याला पूर्णपणे मदत करु”. ऑस्ट्रेलियन संघाचे मुख्य व्यवस्थापक बेन ऑलिव्हर यांनी बोर्डाची बाजू स्पष्ट केली.

२०२० साली ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासाठी ग्लेन मॅक्सवेल हा ऑस्ट्रेलियन संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे विश्वचषकाआधी मॅक्सवेलच्या तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड प्रयत्नशील आहे.