News Flash

जागतिक उत्तेजक प्रकरणांत २०१७ मध्ये १३ टक्क्यांनी वाढ

‘वाडा’च्या अहवालात भारताचा क्रमांक सातवा

‘वाडा’च्या अहवालात भारताचा क्रमांक सातवा

माँट्रिअल : आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंच्या आकडेवारीत २०१७मध्ये आधीच्या वर्षांपेक्षा १३ टक्क्यांनी वाढ झाल्याचे जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेने (वाडा) अहवालात म्हटले आहे.

२०१६मध्ये उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे १५९५ खेळाडूंनी उल्लंघन केले होते, तर २०१७मध्ये १८०४ खेळाडूंनी उत्तेजकांचे सेवन केल्याचे सिद्ध झाले आहे, अशी माहिती माँट्रिअल स्थित एका संस्थेने अभ्यासांतर्गत दिली आहे. २०१७मध्ये ११४ देशांच्या आणि ९३ क्रीडा प्रकारांमध्ये उत्तेजकांचे सेवन केल्यामुळे खेळाडू दोषी सापडले आहेत. २०१७मध्ये १४५९ खेळाडू उत्तेजक चाचणीद्वारे दोषी आढळले आहेत, तर अन्य खेळाडू चौकशीनंतर उत्तेजकांचे सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती ‘वाडा’ने दिली आहे.

रशियाचा क्रमांक या यादीत पाचवा लागतो. ‘वाडा’ने १० डिसेंबरला रशियावर चार वर्षे बंदी घातली आहे. त्यामुळे २०२०चे टोक्यो ऑलिम्पिक आणि २०२२मध्ये कतारला होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत रशियाला सहभागी होता येणार नाही. २०११ ते २०१५ या कालखंडात रशियाने उत्तेजकांच्या सेवनाला कशा प्रकारे खतपाणी घातले, हे क्रीडा कायदेतज्ज्ञ रिचर्ड मॅकलारेन यांनी तीन वर्षांपूर्वी मांडलेल्या स्वतंत्र अहवालात प्रकाशात आणले होते. त्यामुळे २०१६चे रिओ ऑलिम्पिक, २०१७मध्ये लंडनला झालेली जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा आणि २०१८मधील हिवाळी ऑलिम्पिकमध्ये त्यांच्या अ‍ॅथलेटिक्स चमूला सहभागी होता आले नव्हते.

‘‘स्पर्धेदरम्यान उत्तेजक चाचणी घेणे, हे आव्हानात्मक असते. परंतु जगभरात उत्तेजकविरोधी चळवळ सक्षम करण्यासाठी आम्ही हे शिवधनुष्य आम्ही यशस्वीपणे पेलतो,’’ असे ‘वाडा’चे महासंचालक ऑलिव्हर निगली यांनी सांगितले.

इटलीचे खेळाडू अग्रेसर

उत्तेजक चाचणीत दोषी खेळाडूंमध्ये इटलीचे खेळाडू (१७१) अग्रेसर आहेत. त्यानंतर फ्रान्स (१२८), अमेरिका (१०३), ब्राझील (८४) आणि रशिया (८२) यांचा क्रमांक लागतो.  ‘वाडा’च्या अव्वल १० देशांच्या यादीत चीन, भारत, बेल्जियम, स्पेन आणि दक्षिण आफ्रिका यांचाही क्रमांक लागतो.

शरीरसौष्ठवपटूंचा सर्वाधिक समावेश

उत्तेजक प्रतिबंधक नियमावलीचे उल्लंघन करणारे सर्वाधिक २६६ खेळाडू हे शरीरसौष्ठवमधील आहेत. त्यानंतर अ‍ॅथलेटिक्स (२४२) आणि सायकलिंग (२१८) यांचा क्रमांक लागतो. फुटबॉल आणि रग्बी हे अनुक्रमे सहाव्या आणि आठव्या स्थानावर आहेत.

वयचोरीप्रकरणी ५१ अ‍ॅथलेटिक्सपटू दोषी

नवी दिल्ली : तिरुपती येथे गेल्या महिन्यात झालेल्या राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत वयचोरीप्रकरणी ५१ खेळाडू दोषी सापडले आहेत. याशिवाय वयपडताळणी चाचणी टाळण्याच्या उद्देशाने १६९ खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

तिरुपतीला २४ ते २६ नाव्हेंबर या कालावधीत झालेल्या राष्ट्रीय आंतरजिल्हा कनिष्ठ अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत १४ आणि १६ वर्षांखालील वयोगटाचे ४९४ जिल्ह्यांतून ४५०० मुले आणि मुली सहभागी झाले होते.

वय पडताळी चाचणींतर्गत ५१ खेळाडू दोषी सापडले आहेत. मात्र १२४ नाव नोंदवलेल्या खेळाडूंनी वैद्यकीय चाचणी टाळण्याच्या उद्देशाने स्पर्धेतून माघार घेतली आहे, तर ६५ खेळाडूंनी वैद्यकीय चाचणी अर्धवट सोडली, अशी माहिती भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने दिली आहे.

आग्रा येथे होणाऱ्या भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत वयचोरी प्रकरणी चर्चा ऐरणीवर असेल. राजस्थानचे १५ आणि उत्तर प्रदेशचे १० खेळाडू वयचोरी प्रकरणी दोषी सापडले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 21, 2019 4:24 am

Web Title: global sport doping cases up 13 percent in 2017 wada zws 70
Next Stories
1 सिंधू लवकरच झोकात पुनरागमन करेल!
2 क्रिकेट सल्लागार समिती येत्या दोन दिवसांत नेमणार -गांगुली
3 रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा  : महाराष्ट्राचा सलग दुसरा पराभव
Just Now!
X