आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारलेला युवराज सिंह सध्या ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धेत खेळतो आहे. निवृत्तीनंतर युवराजने बीसीसीआयकडे ग्लोबल टी-२०, कॅरेबियन प्रिमीअर लिगसारख्या स्पर्धांमध्ये खेळण्याची परवानगी मागितली होती. ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धेत टोरांटो नॅशनल्स संघाकडून खेळणाऱ्या युवराज सिंह आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांना पैसेच मिळाने नसल्याचं समोर आलं. याचसाठी टोरांटो नॅशनल्स विरुद्ध मॉन्ट्रियल टायगर्सविरुद्ध सामन्यात युवराज आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सामना खेळण्यास नकार दिला.

ESPNCricinfo वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, खेळाडूंनी पैसे देईपर्यंत बसमध्ये बसणार नाही असा पवित्रा घेतला. ज्यामुळे सामना सुरु होण्यास उशीरही झाला. यानंतर आयोजकांनी खेळाडूंशी चर्चा करत यामधून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं, मात्र युवराजने या सामन्यात न खेळणच पसंत केलं. मिळालेल्या माहितीनुसार ग्लोबल टी-२० कॅनडा स्पर्धेत अनेक खेळाडूंना अद्याप कराराप्रमाणे पैसेच मिळाले नाहीयेत. त्यामुळे काही खेळाडूंनी जोपर्यंत पैसे मिळत नाही तोपर्यंत स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतलाय.

दरम्यान युवराज सिंहने या स्पर्धेत आतापर्यंत ५ सामने खेळले असून यामध्ये त्याची कामगिरी ; १४, ३५, ४५, ५१ आणि ० अशी राहिलेली आहे.