करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेले दोन महिने ठप्प असलेले क्रिकेट सामने पुन्हा एकदा सुरु करण्यासाठी आयसीसीने पहिलं पाऊल टाकलं आहे. क्रिकेटचा सराव आणि सामने सुरु करण्यासाठी आयसीसीने सर्व सदस्यांसाठी काही महत्वाचे नियम जाहीर केले आहेत. ज्यात क्रिकेट मालिका सुरु होण्याआधी १४ दिवसांचा Isolation Camp पासून संघ व्यवस्थापनात प्रमुख वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक असे अनेक नियम आखून देण्यात आले आहेत. खेळाडूंच्या सरावाची जागा, ड्रेसिंग रुम स्वच्छ ठेवण्यापासून सरकारी परवानगी शिवाय सामने खेळवता येणार नाही असे अनेक नियम आयसीसीने घालून दिले आहेत.

अवश्य वाचा – क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी आयसीसीकडून नियमावली जाहीर

याव्यतिरीक्त खेळाडू आणि पंचांसाठीही आयसीसीने काही नवीन नियम आखून दिलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचा महत्वाचा नियम पाळण्यासाठी खेळाडूंची टोपी, गॉगल, टॉवेल, जर्सी पंच सांभाळणार नाहीयेत. बऱ्याचदा गोलंदाजीदरम्यान गोलंदाज आपला गॉगल किंवा टोपी ही पंचांकडे सोपवतो. मात्र आयसीसीच्या नवीन नियमांनुसार आता ही पद्धत बंद करण्यात येणार आहे. याचसोबत पंचांना स्वतंत्र ग्लोव्ह्ज देण्यात येणार आहेत. याचसोबत आपली कोणतीही वस्तू आता खेळाडू आपल्या सहकाऱ्यांकडेही देऊ शकणार नाहीये. मात्र गोलंदाजीदरम्यान खेळाडूंच्या वस्तू कोण सांभाळणार याबद्दल अद्याप स्पष्ट नियम आयसीसीने सांगितले नाहीयेत.

चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ किंवा थुंकीचा वापर न करण्यासाठी आयसीसीच्या समितीने याआधीच शिफारस केली आहे. याचसोबत आयसीसीने खेळाडूंना सामना सुरु झाल्यानंतर चेंडूला डोळे, नाक, तोंडाचा स्पर्श होणार नाही याची काळजी घ्यायचा सल्ला दिला आहे. याचसोबत सराव सुरु असताना खेळाडूंना Toilet Break घेण्यासही आयसीसीने मनाई केली आहे. या सर्व नियमांचा विचार करुन खेळाडूंनी सरावाच्या जागी यावं असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे. याचसोबत स्वतःचं साहित्य हे सराव करण्याआधी व झाल्यानंतर स्वच्छ करण्याचे निर्देशही आयसीसीने खेळाडूंना दिले आहेत.