करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. भारतात क्रिकेटलाही याचा फटका बसला आहे. मात्र अशा परिस्थितीतही भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये धोनीच्या निवृत्तीबद्दल सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु असते. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपूष्टात आल्यानंतर धोनीला भारतीय संघात स्थान मिळालेलं नाही. नवीन वर्षात धोनी आयपीएलद्वारे क्रिकेटच्या मैदानात उतरणार होता. भारतीय वन-डे संघाचा उप-कर्णधार रोहित शर्माला एका चाहत्याने सोशल मीडियावर धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारला. रोहितने या चाहत्याला आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

अवश्य पाहा – दिनेश कार्तिकच्या All Time IPL XI मध्ये धोनीला स्थान नाही…

“धोनी ज्यावेळी क्रिकेट खेळत नाही त्यावेळी तो कोणाच्याही संपर्कात नसतो. त्यामुळे ज्या कोणालाही धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रश्न विचारायचा आहे त्यांनी थेट धोनीकडे जाऊन त्याला विचारावं. तो रांचीमध्ये राहतो, सध्या लॉकडाउन सुरु असल्यामुळे जाता येणार नाही. त्यामुळे लॉकडाउन संपल्यानंतर मिळेल त्या वाहनाने रांचीला जा आणि धोनीला विचारा की तु आता काय करणार आहेस?? खेळणार आहेस की नाही?? विश्वचषकात तो अखेरचा सामना खेळला, त्यामुळे त्यानंतर धोनीबद्दल आम्हाला फारकाही सांगता येणार नाही.” रोहितने सोशल मीडियावर चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर दिलं.

अवश्य पाहा – ७ एकराच्या जागेवर उभं आहे धोनीचं रांचीमधलं अलिशान फार्महाऊस…

याआधीही अनेक आजी-माजी खेळाडूंनी यंदाचा आयपीएल हंगाम रद्द झाल्यास धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं होतं. धोनी सध्या आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत रांची येथील आपल्या फार्महाउसमध्ये आहे. देशातली सध्याची करोनाची स्थिती पाहता, बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित केली आहे. येत्या काळात भारतात क्रिकेट खेळणं शक्य नसल्याचेही संकेत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात धोनी निवृत्तीबद्दल नेमका काय निर्णय घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – मला डावलून चेन्नईने धोनीची निवड केली हे दु:ख आजही कायम – दिनेश कार्तिक