|| प्रशांत केणी

मुंबई : प्रत्येक पदकाचे माझ्या आयुष्यात खूप मोल आहे. गवंडीकाम करून माझे वडील माझी कुस्तीची आवड जोपासत आहे. आता त्यांना ही मोलमजुरी करणे वयपरत्वे अवघड जात आहे. त्यामुळे लवकरच कुटुंबाचा भार मी सांभाळेन, हे सांगताना कोल्हापूरचा विजय बाजीराव पाटील भावुक झाला होता. ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेतील ७४ किलो वजनी गटात त्याने सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली.

कोल्हापूरच्या पश्चिमेकडील भागातील करवीर तालुक्यातील अमशी, पासार्डे आणि बोलोजी ही गावे डोंगराळ भागात वसली आहेत. या भागातील मंडळी उदरनिर्वाहासाठी प्रामुख्याने गवंडीकाम करतात. या भागाची कुस्तीची परंपरासुद्धा मोठी आहे. विजयला कुस्तीची आवड निर्माण करण्यात वडील बाजीराव पाटील यांचा सिंहाचा वाटा. गवंडीकाम करणाऱ्या बाजीरावांनी मुलाला वयाच्या १५व्या वर्षी त्यांच्या अमशी गावातील तालमी सरावाला पाठवले. मग प्रकाश पाटील आणि तानाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फोंडी कासारी संकुल येथे कुस्तीचे धडे त्याने गिरवले. मग चार वर्षांपूर्वी कुस्तीमध्येच कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेत त्याने पुणे गाठले. पुण्यात सह्याद्री कुस्ती संकुल येथे विजय पराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तो व्यावसायिक कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहे.

गतवर्षी थायलंडला झालेल्या आशियाई अजिंक्यपद कनिष्ठ कुस्ती स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई करणारा २१ वर्षीय विजय बारावीत शिक्षण घेत आहे. राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत यंदा चौथे पदक जिंकल्यानंतर भविष्यातील वाटचालीविषयी म्हणाला, ‘‘२०२४च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याचे स्वप्न मी जोपासले आहे. हे पदक म्हणजेच माझ्यासाठी वडिलांची स्वप्नपूर्ती ठरेल.’’