भारतात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. या लाटेतील करोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक क्रिकेटपटू पुढे सरसावले होते. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, यजुर्वेद्र चहल, वीरेंद्र सेहवाग यांनी आर्थिक मदत देऊ केली. आता या आजी-माजी क्रिकेटपटूनंतर फुटबॉलविश्वातूनही करोनाविरुद्ध लढण्यासाठी योगदान येऊ लागले आहे.

करोनाविरुद्ध सुरू असलेल्या लढतीत मदत करण्यासाठी आय-लीगचा विजेता संघ गोकुलम केरळ एफसीचा गोलरक्षक उबैद सीकेने अंतिम सामन्यात वापरलेल्या जर्सीचा लिलाव केला आहे. लिलावातून मिळालेली ३३,००० रुपयांची रक्कम त्याने केरळच्या मुख्यमंत्री आपत्ती निधीमध्ये जमा केली. ३१ वर्षीय उबैदने मणिपूरच्या टीम ट्रॉ विरूद्ध अंतिम सामन्यात ही जर्सी परिधान केली.

मोहम्मद अझरुद्दीनने दाखवली ‘ती’ बॅट, जिच्यामुळे क्रिकेटविश्व झाले होते थक्क!

 

उबैद म्हणाला, “हे आय लीग विजेतेपद ऐतिहासिक होते. मी नेहमीच हे विजेतेपद जिंकण्याचे स्वप्न पाहिले होते. मल्याळी असणे आणि माझ्या राज्य क्लबसाठी हे विजेतेपद जिंकणे माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ही जर्सीसुद्धा माझ्यासाठी खास आहे.”

“ही जर्सी मी जतन करून ठेवण्याचा विचार केला होता, परंतु नंतर माझ्या काही मित्रांनी जर्सीचा लिलाव करण्याची कल्पना दिली. मला वाटले, की याचा उपयोग चांगला होईल. म्हणून मी लिलाव करण्याचा निर्णय घेतला. कोविडच्या रूग्णांना अधिक सहकार्य करणे हे माझे मुख्य उद्दीष्ट आहे. ही एक कठीण वेळ आहे आणि आपण केवळ एकमेकांना मदत करून त्यावर मात करू शकतो”, असे उबैदने सांगितले.

पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळणार झहीर खान