जकार्ता येथे सुरु असलेल्या पॅरा आशियाई खेळांमध्ये भारताचा तिरंदाज हरविंदर सिंहने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. याव्यतिरीक्त मोनु घांगसने थाळीफेकमध्ये रौप्य तर मोहम्मद यासिरने गोळाफेकीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. हरविंदर सिंहने अंतिम फेरीत चीनच्या झाओ लिक्स्युचा ६-० ने पराभव करत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. भारताचं या स्पर्धेतलं हे सातवं सुवर्णपदक ठरलं.

दुसरीकडे थाळीफेक प्रकारात भारताच्या मोनु घांगसने अंतिम प्रयत्नात ३५.८९ मी. लांब थाळी फेरत रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. इराणच्या ओलाद मेहदीने ४२.३७ मी. लांब थाळी फेकत सुवर्णपदक पटकावलं. गोळाफेकीत भारताच्या मोहम्मद यासिरला कझाकिस्तान आणी चीनच्या खेळाडूची झुंज मोडता आली नाही, १४.२२ मी. लांब गोळा फेकल्यामुळे मोहम्मदला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.