भारताने महिलांच्या ४ बाय ४०० मीटर रिले शर्यतीत सलग चौथ्यांदा सुवर्णपदक मिळवीत निर्विवाद वर्चस्व गाजविले. २००२ पासून भारताने या रिलेत आशियाई स्तरावर अपराजित्व राखले आहे. प्रियंका पन्वर, टिंटू लुका, मनदीप कौर व एम. आर. पुवम्मा यांच्या संघाने यंदा ही शर्यत ३ मिनिटे २८.६८ सेकंदात पार करीत भारताचाच ३ मिनिटे २९.०२ सेकंद हा स्पर्धा विक्रम मोडला. हा विक्रम त्यांनी २०१० मध्ये केला होता. अ‍ॅथलेटिक्समध्ये यंदा भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी सीमा पुनिया हिने थाळीफेकीत सोनेरी कामगिरी केली
होती.
जपानने रौप्यपदक मिळविताना रिले शर्यत तीन मिनिटे ३०.८० सेकंदात पार केली. चीन संघास कांस्यपदक मिळाले. त्यांनी हे अंतर तीन मिनिटे ३२.०२ सेकंदात पूर्ण केले. या शर्यतीत पन्वरने भारताकडून धावायला सुरुवात केली. जपानच्या खेळाडूपेक्षा ती थोडी मागे होती मात्र टिंटूने सुरेख धाव घेत भारताला आघाडीवर नेले. मनदीपने ही आघाडी वाढविली. पुवम्माने वेगाने धाव घेत भारताची आघाडी टिकवित सुवर्णपदकावर मोहोर नोंदविली. २०१० मध्ये सुवर्णपदक मिळविणाऱ्या भारतीय संघात मनदीपचा मोठा वाटा होता. येथेही तिने आपल्यावरील जबाबदारी समर्थपणे पार
पाडली.

गोळाफेकीत इंदरला कांस्य
भारताच्या इंदरजितसिंगने गोळाफेकीत कांस्यपदक मिळविले. त्याने १९.६३ मीटपर्यंत गोळाफेक केली. सुलतान अन्हेबसी (१९.९९ मीटर) व मिंग चांग (१९.९७ मीटर) यांना अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक मिळाले. १० हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत भारताच्या राहुलकुमार पाल व सुरेशकुमार यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले.
बॉक्सिंग : सतीश, विकासला कांस्य
बॉक्सर सतीश कुमारने सुपर हेवीवेट गटात कांस्यपदकावर नाव कोरले. उपांत्य फेरीच्या लढतीत कझाकिस्तानच्या इव्हान डायचेकोने त्याचा ३-० असा धुव्वा उडवला.   ७५ किलो वजनी गटातून खेळताना विकास कृष्णनलाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कझाकिस्तानच्या झानीबेक अलिमखानुलीने त्याच्यावर विजय मिळवला.
६ फूट ९ इंच उंचीच्या आणि लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या डायचेकोने सतीश कुमारला निष्प्रभ ठरवले. त्याला उंचीचा फायदा मिळवला. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही त्याच्याविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणारा उत्तर प्रदेशचा पहिला बॉक्सिंगपटू ठरल्याचा आनंद आहे, असे सतीशने सांगितले.२०१० साली गुआंगझाऊ, चीन येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॉक्सिंगपटूंनी २ सुवर्ण, ३ रौप्य आणि ४ कांस्यपदकांची कमाई केली होती. मात्र यंदा मेरी कोमच्या रूपात बॉक्सिंगमध्ये एकच सुवर्णपदक मिळाले आहे. अन्य बॉक्सिंगपटू मिळून पाच पदके मिळाली आहेत. विकास कृष्णनकडून पदकाची अपेक्षा आहे.
टेबल टेनिस: सौम्यजितकडून अपेक्षाभंग
बुधवारी उपउपान्त्यपूर्व फेरीत दमदार प्रवेश केल्यानंतर सौम्यजितकडून पदकाची अपेक्षा भारतीयांनी ठेवली होती, पण त्याने अपेक्षाभंगच केला. सौम्यजित आणि मनिका बात्रा यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पुरुषांच्या उपउपान्त्यपूर्व फेरीमध्ये सौम्यजितला कोरियाच्या सिन्हयोक पाककडून १-४ असा पराभव स्वीकारावा लागला. सिन्हयोकने सौम्यजितला ११-७, ११-८, १३-११, ११-८ असे ३३ मिनिटांमध्ये पराभूत केले.
महिलांमध्ये बात्राला जपानच्या कासुमी इशिकाव्हाने ११-९, ११-६, ११-७, ११-८ असे पराभूत केले. अंकिता दासलाही हाँगकाँगच्या विंग नाम इनजी हिच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.
कबड्डी: दुहेरी सुवर्णाची संधी
भारताचा पुरुष आणि महिला कबड्डी संघ आशियाई कबड्डी स्पर्धेत सुवर्णपदकापासून केवळ एक विजय दूर आहेत. दसऱ्याच्या दिवशी पदकरूपी सोने लुटत सीमोल्लंघन करण्याची त्यांना सर्वोत्तम संधी आहे.
महिला संघाने थायलंडचा ४१-२८ असा धुव्वा उडवला, तर पुरुष संघाने यजमान दक्षिण कोरियावर ३६-२५ असा विजय मिळवला. महिलांच्या लढतीत भारतीय संघाने चांगली सुरुवात केली. मात्र थायलंडने झुंजार खेळ करत १४-१४ अशी बरोबरी केली. मध्यंतरानंतर मात्र भारतीय संघाने थायलंडच्या संघावर लोण चढवत १८-१५ अशी आघाडी घेतली. दुसऱ्या लोणसह भारताने ३४-२४ अशी आघाडी वाढवली. या आघाडीच्या बळावरच भारताने हा सामना जिंकला.
कर्णधार तेजस्विनीने २१ चढायांत १५ तर झटापटीत बोनसचे ३ गुण कमावले. अभिलाषा म्हात्रेने ५ चढायांत २ गुण पटकावले.
पुरुषांच्या अटीतटीच्या लढतीत भारताने बोनस गुणासह खाते उघडले. परंतु कोरियाने जशास तसे उत्तर देत कडवी टक्कर दिली. मध्यंतराला भारताकडे १४-१२ अशी आघाडी होती. विश्रांतीनंतर लगेचच लोण देत भारताने २३-१४ अशी आघाडी वाढवली. ही आघाडी वाढवत भारताने ही लढत जिंकली.
भारतातर्फे जसबीरने १६ चढायांत ९ गुण पटकावले. पहिल्या पकडीदरम्यान त्याच्या डोक्याला दुखापत झाली तरीही त्याने जिद्दीने खेळ करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. अजय ठाकूरने ११ चढायांत ४ झटापटीचे तर बोनसचा १ गुण मिळवला. अंतिम फेरीत दोन्ही संघांसमोर इराणचे आव्हान असणार आहे.
व्हॉलीबॉल: पुरुष विजयी, महिला पराभूत
आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये गुरुवारचा दिवस मिश्र भावनांनी भरला होता. एकीकडे पुरुषांनी थायलंडवर ३-१ असा विजय मिळवला, तर दुसरीकडे महिलांना हाँगकाँगने ३-० असे पराभूत केले.
भारतीय पुरुषांनी हा सामना १ तास आणि २८ मिनिटांमध्ये जिंकला. पहिला गेम भारताने २२-२५ असा गमावला; पण त्यानंतरच्या तीन गेममध्ये दमदार खेळ करत भारताने थायलंडवर मात केली. दुसरा गेम भारताने २५-१८ असा जिंकत थायलंडशी १-१ अशी बरोबरी केली. त्यानंतर तिसरा आणि चौथा गेम अनुक्रमे २५-२३ आणि २५-२० असा जिंकत सामना खिशात टाकला. महिलांना हाँगकाँगकडून १६-२५, २६-२८, १८-२५ असा पराभव स्वीकारावा लागला.
तायक्वांदो आव्हान संपुष्टात
भारतीय तायक्वांदोपटूंचे आशियाई क्रीडा स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. पुरुषांच्या ६३ किलो वजनी गटाच्या उपान्त्यपूर्व फेरीच्या लढतीत सौरवला पराभवाला सामोरे जावे लागले. अफगाणिस्तानच्या अबासी अहमद रोमानने सौरवला ५-४ असे नमवले. ६८ किलो वजनी गटात सौदी अरेबियाच्या अलासमारी गाझ्झी मुशाबाबने शिव कुमारवर ११-७ अशी मात केली. महिलांमध्ये ६२ किलो वजनी गटात चीनच्या चिआ च्युआंगने आसामच्या रेखा राणीचा १५-० असा धुव्वा उडवला. ६७ किलो वजनी गटात यजमान दक्षिण कोरियाच्या वोनजिन लीने श्रेया सिंगवर ७-६ असा निसटता विजय मिळवला.