केरळ संघाकडून मी खेळत असले तरी मी मूळची सांगली येथील रहिवासी असल्यामुळे येथे मिळविलेले सुवर्णपदक माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे व प्रेरणादायक आहे असे राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत सुवर्णपदक मिळविणाऱ्या नेहा खरेने सांगितले.

शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत नेहा ही केरळचे प्रतिनिधित्व करीत आहे. तिने सॅब्रे प्रकारात सुवर्णपदक मिळविताना पंजाबच्या कमलप्रित शुक्ला हिच्यावर १५-१३ अशी मात केली. उपांत्य फेरीत तिने सेनादलाच्या श्रेयाकुमारी हिला पराभवाचा धक्का दिला होता.

नेहा ही मूळची सांगली येथील रहिवासी आहे. ती सध्या केरळमधील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या तलवारबाजी अकादमीत प्रशिक्षण घेत आहे. शालेय जीवनापासूनच तिला खेळाची आवड होती. याबाबत तिने सांगितले, ‘‘माझी आई ही वेटलिफ्टिंगमधील अव्वल दर्जाची खेळाडू होती. त्यामुळे आपणही एखाद्या खेळात देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी माझी तीव्र इच्छा होती. पाचव्या इयत्तेपासूनच मला तलवारबाजीविषयी आवड निर्माण झाली. माझे प्रशिक्षक सागर लागू यांना केरळमधील अकादमीत प्रशिक्षक म्हणून संधी मिळाली व त्यांच्या प्रेरणेमुळेच नवव्या इयत्तेत शिकत असतानाच मी देखील त्याच अकादमीत प्रवेश घेतला.ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघाची लवकरच निवड केली जाणार आहे.’’

नेहा हिने २०१० मध्ये झालेल्या कनिष्ठ गटाच्या आशियाई स्पर्धेत भारतास कांस्यपदक मिळवून दिले होते. तसेच तिने त्याच वर्षी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता.