भारताचा तिरंदाज जसपाल सिंह (२३) आणि राष्ट्रीय तिरंदाज व NIS परीक्षेतील टॉपर सरस सोरेन (२८) यांचा मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यातील लालपूर एयर स्ट्रिपजवळ अपघाती मृत्यू झाला. बुधवारी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४३ वर अपघात झाला. जसपाल सिंह आणि शरस सोरेन यांची कार राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर मागून आदळली. ही धडक इतकी जोरदार होती की कारच्या पुढील भागाचा चुराडा झाला. सरस सोरेन याचा जागेवरच मृत्यू झाला, तर जसपाल सिंह याचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.

जसपाल सिंह आणि सरस सोरेन हे दोघेही राष्ट्रीय ज्युनियर तिरंदाजी स्पर्धेसाठी जात होते. गेल्या वर्षी थायलंड येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत जसपाल सिंह याने सुवर्णपदक जिंकले होते. तर सोरेन २ महिन्यांपूर्वी झालेल्या NIS प्रमाणपत्र परीक्षेत पहिला आला होता. दोघेही रांचीच्या एक्‍स्पोर्ट क्‍लबमधून राष्ट्रीय खेळाडू बनले होते.

दरम्यान, दुर्घटनेची माहिती मिळताच झारखंड तिरंदाजी संघाचे अध्यक्ष अर्जुन मुंडा यांनी भोपाळशी संपर्क साधून दोघांची चौकशी केली. त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्थाही केली होती. पण त्याआधीच त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.