सरकारी उदासीनतेमुळे तामिळनाडूमधील एका राज्यस्तरीय महिला खेळाडूवर उदरनिर्वाहासाठी चहा विकण्याची वेळ आली आहे. सुवर्णपदक जिंकत राज्याचं नाव उंचावणा-या या खेळाडूकडे सरकारने मात्र पुरतं दुर्लक्ष केलं. ४५ वर्षीय ए कलईमिनी यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि तीन मुलांच्या संगोपनासाठी चहा विकावा लागत आहे. एकेकाळी ४५ किमी मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेल्या कलईमिनी सध्या कोईम्बतूरमध्ये टी स्टॉलवर चहा विकताना दिसतात. एकीकडे सध्या कॉमनवेल्थमध्ये सुवर्णपदक जिंकणा-या खेळाडूंचं गुणगान सुरु असताना कलईमिनी यांच्यासारखे अनेक खेळाडू सुवर्णपदक जिंकूनही हलाखीचे जीवन जगतायत.

‘सरकारकडून खेळाडूंना कोणतीच मदत दिली जात नाही. चहाच्या टपरीवर मी दिवसाला किमान ४०० ते ५०० रुपये कमावते. माझं कुटुंब याच पैशावर चालतं’, असं कलईमिनी सांगतात. आपल्या जबाबदारीमुळे खेळ सोडावा लागला असला तरी कलईमिनी मॉर्निग वर्कआऊट सेशन मात्र न चुकता करतात. रोज सकाळी त्या २१ किमी धावतात. हा आपल्या सरावाचा भाग असल्याचं त्या सांगतात.

कलईमिनी यांचं शिक्षण दहावीपर्यंत जालं आहे. शाळेच्या दिवसांत त्यांनी अनेक कबड्डी आणि अॅथलेटिक्स स्पर्धेत भाग घेतला होता. ‘मी बँकेत कर्जासाठी अर्ज केला होता पण त्यांनी नकार दिला. म्हणून मग खेळात सहभागी होण्यासाठी मी माझ्या मित्रांकडून पैसे उधार घ्यायचे’, असं त्यांनी सांगितलं.